Pune PMPML Bus Sarkarnama
पुणे

Pune News : मोदी सरकारचे पुणेकरांना गिफ्ट : महापालिका निवडणुकीपूर्वीच ट्राफिकवर जालीम उपाय

Pune PMPML Gets Electric Buses : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पुणे पीएमपीएमएलच्या ताफ्यात 1000 नव्या ई-बस समाविष्ट करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांमुळे एच.डी. कुमारस्वामी यांनी प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे पुणेकरांना कोंडीतून मुक्तता आणि प्रदूषणावर ब्रेक मिळणार आहे.

Rashmi Mane

पुणे-पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पुणे शहरासाठी एक हजार नवीन 'ई-बस' खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे. लवकरच या बस 'पीएमपीएमएल'च्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

सार्वजनिक वाहतुकीला बळकटी

या निर्णयामुळे लवकरच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस ताफ्यात या 1000 ई-बसचा समावेश होईल. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

वाहतूक कोंडी कमी होणार: शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. अधिक बस आल्यामुळे जास्तीत जास्त लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील, ज्यामुळे रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी होऊन कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक होणार आहे. या बसमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषणात घट होईल आणि नागरिकांना स्वस्त, सोयीस्कर व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल.

मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत 'पीएमपीएमएल' ही सर्वात महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार पाहता पीएमपीएमएलच्या ताफ्यात किमान 3000 बस असणे आवश्यक असल्याचे अधिकारी सांगतात. सध्या पीएमपीच्या ताफ्यात जवळपास 2000 बस आहेत, त्यामुळे नवीन बसची गरज होती. पीएमपीएमएलकडे असलेल्या 2000 पैकी 750 स्वतःच्या तर उर्वरित ठेकेदारांच्या आहेत. त्यामुळे या नव्या ई-बस मंजुरीमुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पीएम-ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत या बस मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांची वारंवार भेट घेतली आणि या प्रस्तावाला गती दिली. या प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य देखील महत्त्वाचे ठरले, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

तातडीने अंमलबजावणीचे आश्वासन

मोहोळ यांनी सांगितले की, या बसेससाठी निधी उपलब्ध होण्याकरिता राज्य शासनाकडून तातडीने रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर पीएमपीने 1000 'ई-बस'चा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे सादर केला. हा प्रस्ताव त्वरित मंजूर व्हावा म्हणून 15 दिवसांपूर्वीच त्यांनी एच.डी. कुमारस्वामी यांची भेट घेतली होती, ज्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

विकासावर भर

मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले की, पीएमपीच्या ताफ्यात अधिकाधिक बस आणणे हा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे. मेट्रोच्या विस्तारीकरणानंतर आता पीएमपीचे सक्षमीकरण करणे हे त्यांचे प्राधान्य आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणेकरांच्या वतीने आभार मानले आहेत. लवकरात लवकर या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, याकडे आपले लक्ष असेल, असे मोहोळ यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT