

Pune News : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मधील प्रभावी राजकीय नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील पक्ष कार्यालयात भेट घेतली. कुटुंबासह दाखल झालेल्या धवलसिंह यांच्या या भेटीमुळे सोलापूरमधील राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. सोलापुरमधील दोन माजी आमदारांनी अजित पवार गट सोडल्याने कमकुवत झालेल्या पक्षाला धवलसिंह यांचा पाठिंबा मिळाल्यास सोलापूर जिल्ह्यातील ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धवलसिंह मोहिते पाटील हे मूळचे अकलूजचे रहिवासी असून, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. तसेच, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे चुलत भाऊ म्हणून त्यांचे मोहिते पाटील कुटुंबातील स्थान महत्त्वाचे आहे. धवलसिंह यांचे वडील, ज्येष्ठ नेते कै. प्रतापसिंह मोहिते पाटील हे खासदार आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून सक्रिय होते. या कुटुंबाचे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठे वलय आहे, ज्यामुळे धवलसिंह यांचा अकलूज आणि परिसरातील दबदबा मानला जातो.
राजकीय कारकीर्दीत धवलसिंह यांनी काँग्रेस आणि शिवसेनेत काम केले असले तरी सध्या ते जनसेवा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत. याआधी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. मात्र, गेल्या वर्षी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आरोप करत त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता.
सोलापुरमधील माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांनी अलीकडेच अजित पवार गट सोडल्याने पक्षाला धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सोलापूरकडे लक्ष केंद्रित केले असून, धवलसिंह यांच्या भेटीला मोठे राजकीय महत्त्व आहे.
धवलसिंह यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा जोर धरत असून, यामुळे अजित पवार यांना सोलापूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मजबुती मिळेल, असे बोले जात आहे. भेट नेमकी कशासाठी झाली याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र पुण्यातील पक्ष कार्यालयात सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. मात्र या भेटीचा सोलापूरमधील राजकारणात परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.