Pune Police: खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन गोळीबाराच्या गंभीर घटनांची मोठी प्रशासकीय किंमत मोजावी लागली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या पोलीस ठाण्याची अख्खी डिटेक्शन ब्रांचच बरखास्त केली आहे. डिटेक्शन ब्रांचमध्ये कार्यरत असलेल्या १३ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात रवानगी करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणात खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि गुन्हे शाखा युनिट-१ चे निरीक्षक अजित जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.
२४ जुलै रोजी घोरपडे पेठ आणि लोहियानगर परिसरात पूर्ववैमनस्यातून गोळीबाराच्या २ स्वतंत्र घटना घडल्या होत्या. पहिल्या घटनेत घोरपडे पेठ पोलीस चौकीजवळ अनुसया टॉवर्ससमोर नुरु शेख याच्यावर गोळीबार करण्यात आला. जुन्या वादातून सुजल उर्फ चिम्या परदेशी आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी नुरु शेख यांच्या पाठीत लागल्याने ते जखमी झाले. त्याच दिवशी सायंकाळी लोहियानगरमध्ये ओम्या गायकवाड याच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. मात्र, नेम चुकल्याने तो बचावला.
या दोन्ही घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या घटनांनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने कारवाई करत खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि गुन्हे शाखा युनिट-१ चे निरीक्षक अजित जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली केली होती. त्याचवेळी वाहतूक शाखेतील निरीक्षक धनंजय पिंगळे यांची खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
गोळीबाराच्या घटनांनंतर गुन्हे उघडकीस आणणे, प्रतिबंधात्मक कारवाई आणि स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात झालेल्या त्रुटींची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी आता डिटेक्शन ब्रांचवरच कारवाई केली आहे. मुख्यालयात रवानगी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये हर्षल दुडुम, किरण ठवरे, कृष्णा गायकवाड, विकास पांडुळे, दिनेश गायकवाड, शुभम केदारी, अक्षय वाबळे, विश्वजीत गोरे, निलेश दिवटे, भाऊसाहेब सोडमिसे, पांडुरंग चंदिले आणि सैपन मुलुख नदाफ यांचा समावेश आहे.
एका दिवसात झालेल्या दोन गोळीबारानंतर प्रथम वरिष्ठ निरीक्षकांची बदली आणि त्यानंतर संपूर्ण डिटेक्शन ब्रांच बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी नियंत्रणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश पोलिस दलाला दिल्याची चर्चा आहे. सलग दोन मोठ्या कारवायांमुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, इतर पोलीस ठाण्यांनाही हा इशारा मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.