पुणे

Pune Police crime : पुण्यात रक्षकच बनले भक्षक! 55 वर्षीय प्राचार्यांना 'पोक्सो'ची भीती दाखवून पोलिसांनीच उकळली खंडणी!

Pune crime news police corruption : पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 55 वर्षीय प्राचार्यांना POCSO प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन पोलिसांनी खंडणी उकळल्याचा आरोप.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यातील एका ५५ वर्षीय प्राचार्यांना धमकावून, पोक्सो कायद्यान्वये कारवाईची आणि संस्थेची बदनामी होण्याची भीती दाखवून एका पोलीस उपनिरीक्षकासह तिघांनी सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दामिनी पथकातील रीलस्टार सोनाली हिंगे यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार कठोर कारवाई सुरू आहे.

प्राचार्य धनकवडी येथे राहतात. जुलै २०२५ मध्ये आरोपींनी त्यांच्या कॉलेजमध्ये भेट दिली. आरोपींमध्ये सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दामिनी मार्शल म्हणून कार्यरत सोनाली हिंगे (सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून प्रसिद्ध) आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सुदाम तायडे यांचा समावेश आहे.

प्राचार्यांच्या म्हणण्यानुसार, बडे यांनी प्राचार्यांना विचारले, “तुम्ही एका मुलीचे कागदपत्रे काढून ठेवली आहेत का?” प्राचार्यांनी प्रवेश नियमांनुसार कागदपत्रे कॉलेजकडे ठेवल्याचे सांगितले. त्यावर बडे यांनी एक कागद दाखवला आणि सांगितले की, “या विद्यार्थिनीला तुम्ही मेट्रो स्टेशनवर बंदुकीचा धाक दाखवून गाडीत ओढले असल्याची तक्रार आली आहे.” तक्रारीत तसे उल्लेख होते, पण त्यावर कोणतेही आवक-जावक क्रमांक नव्हते.

प्राचार्यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगितले. तेव्हा बडे यांनी “तुमच्याकडे पिस्तूल आहे का?” असा प्रश्न विचारून, मुलगी १८ वर्षांखालील असल्याने पोक्सो कायद्यान्वये कारवाई होऊ शकते, अशी धमकी दिली. “संस्थेचे नाव बदनाम होईल, प्रेसमध्ये बातम्या येतील,” असे सांगून भीती दाखवली. “मी हा अर्ज रेकॉर्डवर न घेता तुम्हाला भेटायला आलो आहे,” असेही बडे म्हणाले.

सोनाली हिंगे यांनी मुलीला समजावून सांगितल्याचे सांगितले. नंतर बडे बाहेर गेले आणि हिंगे व तायडे यांच्याशी चर्चा करून परत आले. त्यांनी प्राचार्य व कॉलेज सीईओ यांना सांगितले, “संस्थेची बदनामी टाळण्यासाठी १० लाख रुपये द्या, मुलीला तयार केले आहे.” प्राचार्यांनी नकार दिल्यावर बडे यांनी पुन्हा धमकावले. नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने आणि कॉलेजची बदनामी टाळण्यासाठी प्राचार्यांनी ७ लाख रुपये देण्याचे मान्य केले. “मुलीच्या शिक्षणासाठी” असे सांगून ही रक्कम स्वीकारली. प्राचार्यांनी घरात साठवलेले पैसे आणि कुटुंबीयांच्या बँक खात्यातून ७ लाखांची रक्कम काढून दिली.

८ मार्च २०२६ रोजी दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी प्राचार्यांना बोलावून मुलीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेला तक्रार अर्ज दाखवला. चौकशीत प्राचार्यांना कळले की, आरोपींनी मुलीला हाताशी धरून खोटा अर्ज दाखल करण्यास भाग पाडले होते. भीती दाखवून, फसवणूक करून खंडणी उकळली गेल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकारामुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT