

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात कार्यरत असलेले तरुण आणि कर्तव्यदक्ष तहसीलदार राकेश गिड्डे यांचे लातूर-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. आज सकाळच्या सुमारास रेणापूर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे महसूल विभागासह संपूर्ण केज तालुक्यात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. रेणापूर फाट्याजवळ पोहोचताच त्यांच्या कारवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे गाडी वेगाने रस्त्यावरून घसरत पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला. कारमध्ये ते एकटेच असल्याची माहिती समोर आली आहे. गाडी पलटी झाल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील प्रक्रिया सुरू केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
राकेश गिड्डे हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ, संयमी आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या कामाच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिला होता. त्यांच्या अशा अकाली निधनामुळे सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार गाडीचा वेग जास्त असल्याने नियंत्रण सुटले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेने गिड्डे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात परिवार आणि मित्रपरिवार आहे. संपूर्ण केज तालुका त्यांच्या आठवणीत शोकाकुल झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.