Pune Police officials during an operation in Budhwar Peth area, where illegal Bangladeshi nationals were found residing, leading to suspension of a woman police constable. Sarkarnama
पुणे

Pune Police: बुधवार पेठेत बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी तरुणीबाबत माहिती लपवली,पैसे उकळल्याचा गंभीर आरोप; महिला पोलीस निलंबित

Budhwar Peth raid : बुधवार पेठेत बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी तरुणीबाबत माहिती लपवून पैसे घेतल्याच्या आरोपावरून पुणे पोलिस दलातील महिला हवालदार निलंबित करण्यात आली.

Sudesh Mitkar

Pune Police News : पुणे पोलिसांना काही दिवसांपूर्वी बुधवार पेठ परिसरातील डिस्को बिल्डिंगवर छापा टाकत दहा बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं. मात्र, त्यानंतर काही दिवसांमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता महिला पोलीस हवालदाराचं निलंबन करण्यात आल्याचं समोर येत आहे.

पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या वस्तीमध्ये सातत्याने बेकायदा बांगलादेशींचा रहिवास असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेकदा पोलिसांनी रेड टाकूनही बांगलादेशी सापडून येत नसल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे या बांगलादेशींना लपून राहण्यासाठी पोलीसच मदत करताहेत की काय ? असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात होता.

अशातच बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदाराला पोलिस उपायुक्‍तांनी निलंबित केल्याची घटना समोर आली आहे.

बांगलादेशी तरुणीबाबतची माहिती मिळूनही याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना न देणे, तसेच त्‍या तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप महिला हवालदारावर करण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.

देशभरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुमारे वर्षभरापूर्वी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातही अशा नागरिकांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. शहरात बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. मोठ्या प्रमाणात बांगलादेशांचे वास्तव्य पुणे शहरात असल्याचे वेळोवेळी अधोरेखित झाला आहे.

दरम्यान, ही बांगलादेशी तरुणी २०२३ मध्ये दलालामार्फत बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत आली होती. त्यावेळी ती अल्पवयीन होती. वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिने नुकतीच फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार मध्यस्थ, कुंटणखान्याचा मालक यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा नोंदवण्यापूर्वी संबंधित महिला हवालदारांची त्या तरुणीशी भेट झाली होती. मात्र, याबाबतची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नव्हती. बुधवार पेठेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत सरकारनामाशी बोलताना ऋषिकेश रावले सांगितले की, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर जे काही आरोप करण्यात आले आहेत, त्याबाबत चौकशीही करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT