Pune Police and Pooja Khedkar Sarkarnama
पुणे

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा जबाब नोंदविला ?

सरकारनामा ब्यूरो

Pune News : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी त्या राहत असलेल्या नॅशनल सोसायटीच्या कार्यालयामध्ये खेडकर यांचा जबाब नोंदविला असल्याची माहिती आहे. बाणेर रोडवर असलेल्या नॅशनल सोसायटीमध्ये खेडकर कुटुंबाचा बंगला आहे. या सोसायटीच्या कार्यालयात शनिवारी सकाळी पोलिस आले होते.

येथे वादग्रस्त आयएएस अधिकारी यांच्याकडे एक ते दीड तास चौकशी करुन खेडकर हा जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती साम वृत्तवाहिनीने दिली आहे. यामध्ये त्यांना विविध प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यानंतर त्यांचा जबाब घेण्यात आला. सोसायटीच्या कार्यालयात पोलिस अधिकारी दोन तास थांबून होते.

आयएएस अधिकारी यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला छळ केल्याची तक्रार वाशीम पोलिसांकडे केली होती. त्यानंतर वाशिम पोलिसांनी ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी पुणे पोलिसांकडे वर्ग केली आहे. त्यानुसार पुणे पोलिसांनी त्यांना जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजाविली होती.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या विविध उद्योगांमुळे आयएएस (IAS) अधिकारी पूजा खेडकर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. आयएएस अधिकारी होताना त्यांनी अनेकदा बनवाबनवी केली असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. आपल्या स्वत:च्या, आई- वडीलांच्या नावात बदल करत चुकीचे कागदपत्रे तयार करून त्यामाध्यमातून खेडकर यांनी सवलती घेतल्या असल्याचे पुढे आले आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करताना खेडकर यांनी तेथील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याचे समोर आले होते. बसण्याासाठी अद्यावत सोयीसुविधांयुक्त केबीन द्यावे, दिमतीला कर्मचारी नेमावे, अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याकडून वाढत असलेल्या मागण्यांमुळे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला अहवाल पाठवित याची माहिती दिली होती. खेडकर यांना इतर जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी पाठवावे, अशी विनंती दिवसे यांनी केली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने त्यांना वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी पाठविले होते. या दरम्यान, पूजा खेडकर आणि त्यांचे आई- वडील यांचे अनेक कारनामे समोर आले होते. वाशिम जिल्ह्यात गेल्यानंतर पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी दिवसे यांनी आपला छळ केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी (Police) पूजा यांना जबाब नोंदविण्याासाठी पुणे पोलिस आयुक्तालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यासाठी पुणे पोलिसांनी पहिली नोटीस दिली होती. मात्र त्यानंतर त्या हजर न राहिल्याने पुणे पोलिसांनी त्यांना दुसरी नोटीस देत हजर राहण्यास सांगितले होते.

दरम्यान, वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी यूपीएससीने त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचा मोठा निर्णय शुक्रवारी घेतला.सोबतच पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे. यात यूपीएससीने खेडकर यांना तुमची निवड रद्द का करू नये असा सवालही नोटिसमध्ये केला आहे.

या कारवाईनंतर शुक्रवारी संध्याकाळी खेडकर वाशिममधून बाहेर पडल्या होत्या. शनिवारी त्या पुण्यात येऊन पोलिसांकडे आपला जबाब नोंदवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार त्यांचा बंगला असलेल्या नॅशनल सोसायटीच्या कार्यालयात दीड ते दोन तास पोलिस अधिकारी आले होते. तेथे त्यांचा जबाब नोंदविल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT