Pune News : पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एकाच पोलीस स्टेशनमधील तब्बल 32 कर्मचाऱ्यांची एकाचवेळी बदली करण्याचे आदेश जारी केले आहेत. ही बदली प्रशासकीय कारणांमुळे असल्याचे सांगितले जात असले तरी पोलिस दलात यामागे इतरही काही महत्त्वाची कारणे असल्याची चर्चा रंगली आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. या बदलीत 3 सहायक पोलिस फौजदार, 10 पोलीस हवालदार आणि 19 पोलिस अंमलदार यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी आता पुण्यातील विमानतळ पोलिस ठाणे आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्यात हलवले जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिस ठाणे पूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत होते. सुमारे 5 वर्षांपूर्वी हे ठाणे पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आले. मात्र, तेव्हापासून या ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांची बदली झालेली नव्हती. काही कर्मचारी तर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राहत असूनही वर्षानुवर्षे तेथेच कार्यरत होते.
शहर आयुक्तालयात समावेश झाल्यानंतरही त्यांची जवळच्या इतर पोलिस ठाण्यांत बदली करण्यात आली नव्हती. काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, परिमंडळ 6 चे पोलिस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा मुद्दा गंभीरपणे उपस्थित करण्यात आला. त्यानंतर ही बाब समोर आली आणि अखेर "बदलीचा बाँब" फोडण्यात आला.
या जुन्या कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात नवीन कर्मचारी कार्यरत होणार आहेत. यामुळे ठाण्याच्या कामकाजात नवीन ऊर्जा येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी नव्या ठिकाणी हजर झाल्याचा अनुपालन अहवाल त्वरित कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.