पोर्शे कार अपघातप्रकरणात तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या या गाजलेल्या प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या गैरवर्तनासाठी त्यांच्या पालकांची जबाबदारी निश्चित असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगत न्यायालयाने पालकांच्या भूमिकेवर कठोर टीका केली आहे. केवळ मौजमजा आणि चैनसाठी अल्पवयीन मुलांच्या हाती महागड्या गाड्यांच्या चाव्या आणि अमर्याद पैसा देणे अजिबात स्वीकारार्ह नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
या प्रकरणात अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना जामीन देण्यात आला आहे. अल्पवयीन पोर्शे कार चालक आणि त्याच्या दोन मित्रांच्या रक्तनमुने बदलल्याचा आरोप या तिघांवर आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. अमर सतीश गायकवाड, आदित्य अविनाश सूद आणि आशिष सतीश मित्तल अशी जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणात एकूण दहा जणांविरोधात भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलाचे पालक, काही डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी आणि इतर मध्यस्थांचा समावेश आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२५ मध्ये नऊ आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते. त्यानंतर संबंधित आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
१८ मे २०२४ रोजी मध्यरात्री कल्याणीनगर येथे भरधाव वेगात पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाने दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अपघातापूर्वी हा मुलगा आणि त्याचे दोन मित्र मुंढवा येथील पबमध्ये मद्यप्राशन करून बाहेर पडल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर सर्वांना ससून रुग्णालयात नेण्यात आले होते.
पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की, मद्यप्राशनाचे पुरावे लपवण्यासाठी रक्तनमुने बदलण्यात आले. यासाठी काही डॉक्टरांना लाच देण्यात आल्याचा आरोप आहे. एका आरोपीने डॉक्टरांच्या सहाय्यकाला तीन लाख रुपये दिल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना न्यायालयाने पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे ठामपणे नमूद केले.
दरम्यान, अल्पवयीन मुलाची आई आणि आजोबा सध्या जामिनावर बाहेर आहेत, तर वडील विशाल अग्रवालसह सहा आरोपी अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. हे प्रकरण समाजात जबाबदारी, पालकत्व आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारे ठरले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.