

राज्यातील नोकरदारवर्गासाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी लवकरच निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने त्या दिवशी भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. या आदेशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणाऱ्या भागांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देणे बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे जे कर्मचारी कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत आहेत, पण त्यांचे मतदान क्षेत्र संबंधित जिल्ह्यात आहे, अशांनाही मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही सुट्टी उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना लागू असेल. यामध्ये खासगी कंपन्या, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी आणि औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेल व्यवसायांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ७ फेब्रुवारी रोजी सुट्टी देणे किंवा मतदानासाठी आवश्यक ती सवलत देणे व्यवस्थापनावर बंधनकारक असेल.
तसेच, काही अपवादात्मक परिस्थितीत जिथे कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अत्यावश्यक सेवा किंवा सार्वजनिक हिताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल. अशा वेळी संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक राहील, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
ही सार्वजनिक सुट्टी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या जिल्ह्यांतील संबंधित तालुक्यांमध्ये लागू असणार आहे.
रायगड -
पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड. रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर
रत्नागिरी -
मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर); सिंधुदुर्ग (वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग
पुणे -
जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर)
सातारा -
खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण, कराड
सांगली -
आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा, मिरज
सोलापूर -
करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट
कोल्हापूर -
शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड
छत्रपती संभाजीनगर -
सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण
परभणी -
जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड)
धाराशीव -
परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा, उमरगा
लातूर -
अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकूर, रेणापूर, लातूर, शिरूर (अनंतपाळ), देवणी, औसा, निलंगा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.