amitesh kumar on pune Porsche Crash News sarkarnama
पुणे

Pune Porsche Crash News : "रक्त चाचणी अहवाल असो किंवा नसो, हे...", अखेर आयुक्त अमितेश कुमार बोललेच

Pune Hit And Run Case : अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यास विलंब केल्यानं अक्लहोल अहवाल निगेटिव्ह आला आणि त्यास जामीन मिळाल्याचा आरोप केला जात होता.

Chaitanya Machale

Pune Accident News, 24 May : पुण्यातील कल्याणीनगर भागात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल ( Vishal Agarwal ) यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवित दोन जणांना चिरडलं होतं. या अपघातामध्ये दुचाकीवरून जाणारे अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघे अभियंते होते.

या अपघातानंतर पोलिसांनी गाडी चालविणाऱ्या अल्पवयीन आरोपीसह अन्य दोन जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची ससून रूग्णालयात रक्ताची तपासणी केली. त्यामध्ये अल्कहोलचे प्रमाण न आढळल्याने अवघ्या 15 तासांमध्ये न्यायालयानं अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर केला होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला होता. सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा होऊन पोलिसांवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. या गंभीर प्रकारानंतर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी देखील पुणे पोलिस आयुक्तालयात 'सरप्राईज व्हिजिट' देत अधिकाऱ्यांशी चर्चा करत आवश्यक ते सूचना दिल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यास जाणीवपूर्वक विलंब केला. यामुळे त्याचा अल्कहोल अहवाल निगेटिव्ह आला आणि त्याला जामीन मंजूर झाला, असा आरोप केला जात होता. पोलिसांवर होत असलेल्या या आरोपावर आता पोलिस आयुक्त अमितेश कुमार ( Amitesh Kumar ) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पोलिस आयुक्त म्हणाले, "अतिवेगाने पोर्श कार चालवून दुचाकीला धडक दिलेल्या या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करून सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास, त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ससून रुग्णालयामध्ये नऊ वाजण्याच्या सुमारास त्याची रक्त चाचणी करण्यात आली. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयामध्ये देखील संध्याकाळी पाच ते सहा वाजता त्याची रक्त चाचणी करण्यात आली होती. मुलाच्या रक्तचाचणीचा अहवाल महत्त्वाचा नाही. रक्त चाचणी अहवाल असो किंवा नसो हे प्रकरण असे आहे की, संबंधित अल्पवयीन मुलाला हे माहीत होते की दारु पिणे आणि अरुंद रस्त्यावर भरधाव वेगाने कार चालविल्यानं लोकांचा मृत्यू होऊ शकतो."

"पोलिस खाते या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तसेच, सर्व ठोस पुरावे गोळा करत आहोत. तांत्रिक पुराव्यांवर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत. या मुलाने बारमध्ये जाऊन मद्य प्यायले त्याचे 48 हजार रुपये बिल क्रेडिट कार्डने दिले. त्याची तांत्रिक माहिती आणि त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ आमच्याकडे आहे. त्यावरून हा अल्पवयीन मुलगा मद्य प्यायला होता हे सिद्ध होत आहे," असेही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT