Porsche Accident News : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला अजून 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याची मान्यता द्यावी, असा अर्ज पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे दाखल केला आहे. यामुळे या अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मु्क्काम आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवित एका दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत कारवाई सुरू केली आहे. या आरोपीला 15 तासातच जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे सर्वच स्तरातून यावर जोरदार टीका केली जात होती. पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या टीकेनंतर बाल न्याय मंडळाने आपल्या निर्णयात बदल करत या अल्पवयीन आरोपीला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार गेल्या 14 दिवसांपासून हा आरोपी बालसुधारगृहात आहे.
या अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात ठेवण्यात आल्यानंतर या अपघातप्रकरणातील अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. या मुलाचे अपघातानंतर (Accident) ससून रूग्णालयामध्ये ब्लड सॅम्पल बदलण्यात आले. त्याच्या ड्रायव्हरला गुन्हा आपल्या नावावर घ्यावा, यासाठी धमकाविण्यात आले. त्याचे अपहरण करून खोलीत डांबून ठेवल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून आतापर्यंत या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये या मुलाचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल, आई शिवानी अगरवाल, ससूनमधील दोन डॉक्टर, एक शिपाई याच्यासह ज्या पबमधून या मुलाला दारू देण्यात आली होती. त्यांचे मालक, मॅनेजर यांचा समावेश आहे.
अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात ठेवल्यानंतर यातील अनेक बाबी समोर आल्या आहेत. या मुलाच्या बालसुधारगृहात ठेवण्याची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्याला आणखी 14 दिवस बालसुधारगृहात ठेवावे, असा अर्ज पुणे पोलिसांनी दाखल केला आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहायक पोलिस (Police) आयुक्त सुनील तांबे यांनी हा अर्ज केला आहे.
बाल न्याय 2015 चे कलम 15 नुसार विधी संघर्षित बालकाचे मूल्यांकन करण्यासाठी गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व कागदपत्रे एक महिन्यात पाठविणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल होऊन 16 पेक्षा अधिक दिवस झालेले आहेत. या गुन्ह्याच्या तपासामध्ये व्यस्त असल्यामुळे आणि तपासामधून अधिक पुरावा मिळण्याची शक्यता असल्यामुळे मुलाच्या मुदतवाढीबाबच्या अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी 14 जूनपर्यंत मुदतवाढ मिळण्यात यावी, अशी विनंती देखील पोलिसांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.