Pune Porsche Crash Update Sarkarnama
पुणे

Pune Porsche Crash Update : मुश्रीफांनी हात झटकले; डॉ. तावरेंच्या शिफारशीचे खापर टिंगरेंवर फोडले!

Pune Porsche Accident :आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ. अजय तावरे याला अटक केली. डॉ. तावरे याच्याकडे विभागाची जबाबदारी द्यावी, असे शिफारस पत्र आमदार सुनील टिंगरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे दिले होते.

Chaitanya Machale

Pune Hit And Run Case News : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबियांपाठोपाठ पोलिस, ससूनमधील डॉक्टरांचे 'रॅकेट' उघड झाले आणि आतापर्यंत डझनभर दोषींवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, या घटनेत आमदार, मंत्र्यांचेही हात असल्याचे तपासातून आता पुढे येऊ लागले आहे. ससूनमधील डॉ.अजय तावरेंच्या नेमणुकीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे चांगलेच गोत्यात आले.

गंभीर बाब म्हणजे, ससूनचे डीन डॉ.विनायक काळे यांनी थेट मीडियापुढेच मुश्रीफ,टिंगरेंची नावे उघड केली.त्यावरून चांगलाच गोंधळ उडाला.आपले नाव पुढे येताच, हसम मुश्रीफांनी मीडियापुढे येऊन डॉ.तावरेंच्या नेमणुकीसाठी टिंगरे यांचेच पत्र कारणीभूत असल्याचे सांगून टाकले. म्हणजे, या प्रकरणात आपले नाव गोवले जात असल्याचा आव आणून मुश्रीफ यांनी हात झटकले आणि टिंगरेंना यात अडकवले. हा अपघात घडल्यापासून चर्चेत असलेल्या आमदार टिंगरेंवर मंत्री मुश्रीफ यांनीही शिफारशीचे खापर फोडल्याने पोलिस तपासाची चक्रे आता टिंगरेंकडे वळू शकतात का? यावर उलटसुटल चर्चा होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परिणामी, या संपूर्ण घटनेवरून विरोधकांनी 'टार्गेट' केल्यावर पत्र काढून आपली बाजू मांडणारे आमदार टिंगरे आता काळे आणि मुश्रीफ यांच्या खुलाशावर तरी बोलणार का, याकडे लक्ष लागले आहे. कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने आपल्या ताब्यात असलेली पोर्श कार चालवून दोन जणांना उडविले. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरून जाणाऱ्या या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने थेट जामीन मंजूर करण्याचा प्रताप केला. दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर अवघ्या १५ तासात या अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्याने पोलिसांच्या कारभारासह बाल न्याय मंडळाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला जात होता.

या अपघाताला जबाबदार असलेला अल्पवयीन आरोपी हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा असल्याने त्याला पोलिस (Police) स्टेशनमध्ये व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला जात होता. या अल्पवयीन आरोपीला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी ड्रायव्हरवर दबाव टाकण्यात आला. त्याचे अपहरण करण्यात आले. इतकेच नव्हे तर ससून मध्ये तपासणीसाठी देण्यात आलेले या आरोपीचे ब्लड सॅम्पलमध्येही फेरफार केल्याचे उघड झाले. याप्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांसह एका शिपायाला अटक करण्यात आली.

हा अपघात झाला त्या रात्रीच वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे पोलिस स्टेशममध्ये हजर होते. त्यांनी या अल्पवयीन आरोपीवर कारवाई होऊ नये, यासाठी दबाव टाकल्याचे बोलले जात होते. आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ. अजय तावरे याला अटक केली. त्या डॉ. तावरे याच्याकडे विभागाची जबाबदारी द्यावी, असे शिफारस पत्र आमदार सुनील टिंगरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे दिले होते. त्यांनी यावर नोट लिहून पुढील कार्यवाहीसाठी ससूनच्या डीनकडे पाठविले होते. या पत्राच्या आधारेच डॉ. तावरे याच्याकडे जबाबदारी दिल्याचे स्पष्टीकरण ससूनचे तत्कालीन डीन विनायक काळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिले होते. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ हे आरोपीच्या पिंजऱ्यात आले होते.

ससूनचे डीन काळे यांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नसल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने डीन काळे यांना सक्तीच्या रजेवर देखील पाठविले आहे. त्यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ.तावरेंच्या नेमणुकीसाठी आमदार टिंगरे यांचेच पत्र कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण माध्यमांसमोर देत संपूर्ण खापर टिंगरे यांच्यावरच फोडले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांचा पाय अधिकच खोलात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT