Sarkarnama
Vijay Wadettiwar Sarkarnama
पुणे

Pune Porsche Accident Case : कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसच आरोपींच्या पिंजऱ्यात; न्यायालयीन चौकशी करण्याची विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची मागणी !

Chaitanya Machale

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवित दोन जणांचा जीव घेतल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. मध्यरात्री भरधाव वेगाने पोर्श कार चालवून या अल्पवयीन मुलाने दोन अभियंत्यांना धडक दिली.

मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर-एअरपोर्ट रस्त्यावरील लँडमार्क सोसायटीजवळ भरघाव राखाडी रंगाची आलिशान पोर्श मोटारीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये अभियंते अनिष अवधिया ( वय 24, रा. पाली, मध्य प्रदेश ), आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा ( वय 24, रा. जबलपूर, मध्य प्रदेश ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणातील आरोपी 17 वर्षीय अल्पवयीन आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कोर्टात हजर केले असता अवघ्या काही तासांमध्ये काही अटींवर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांनी ज्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे, त्यानुसारच कोर्टाने आरोपीला जामिन मंजूर केला आहे.

आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच सर्वच स्तरातून टीकेची झोड उठविली जात आहे. या अपघात प्रकरणात अल्पवयीन असलेला आरोपी हॉटेलमध्ये बसून दारू पित असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले असतानाही पोलिस मात्र अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल देत असल्याने पोलिसांच्या तपासावर शंका घेतली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांच्या या भुमिकेविरोधात कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सोमवारी आंदोलन देखील केले होते. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या शिष्टमंडळाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत त्यांना निवेदन देखील दिले आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस (Police) आयुक्तांना फोन करून या प्रकरणात कोणाचीही गय करू नका, अशा सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे या तपासाला आता वेग येणार आहे.

पोलिसांनी तातडीने पावले उचलत या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील आणि या प्रकरणाती मुख्य आरोपी विशाल अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकाला ताब्यात घेतले आहे. छत्रपती संभाजीनगर भागातून या बांधकाम व्यावसायिकाला पुणे पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

या अपघातामध्ये दोन निष्पाप अभियंत्यांचा बळी गेला असून राजकीय दबवामुळे याचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोपही केला जात आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील यामध्ये लक्ष घातले आहे. या अपघाताची तसेच पोलिसांच्या तपासाची देखील न्यायालयीन (Court) चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

या अपघात प्रकरणातील आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली? आरटीओ कडे रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यांवर गेले तीन महिन्यांपासून कशी फिरत होती. नियम डावलून मध्यरात्री शहरातील बार आणि पब सुरू होते का? जर असतील तर त्यांच्यावर कारवाई का नाही झाली? या प्रकरणाचा तपास करताना पोलिस हे संबधित आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे.

आरोपी अल्पवयीन आहे, हे माहीत असताना देखील त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? असे विविध प्रश्न विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसांची भुमिका ही संशयास्पद असून अपघातामध्ये बळी गेलेल्यांना न्याय देण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाचीच न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT