Amitesh Kumar - Sanjay Raut Sarkarnama
पुणे

Pune Porsche Accident : पोलिस आयुक्त म्हणजे पुण्याला लागलेले 'कलंक', त्यांना बडतर्फ करा, राऊत कडाडले !

Chaitanya Machale

Pune News : कल्याणीनगर येथे झालेला अपघात आणि आरोपीला वाचविण्यासाठी पुणे पोलिसांकडून केले जाणारे प्रयत्न यावर विविध स्तरातून आता जोरदार टीका होऊ लागली आहे. भरधाव वेगाने गाडी चालवून दोन अभियंत्यांचा बळी घेणाऱ्या आरोपीच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

दोन जणांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेला असतानाही या अपघातातील अल्पवयीन आरोपीला क्लिन चिट देण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरु केला आहे. पुणे पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दात पोलिसांचा समाचार घेतला आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या १७ वर्षीय मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवित दोन अभियंत्यांचा बळी घेतला. रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर भागात ही घटना घडली. कल्याणीनगर-एअरपोर्ट रस्त्यावरील लँडमार्क सोसायटीजवळ भरघाव वेगात असलेल्या राखाडी रंगाच्या आलिशान पोर्श या गाडीने एका दुचाकीला धडक दिली.

यामध्ये दुचाकीवरून जात असलेले अभियंते अनिष अवधिया ( वय 24, रा. पाली, मध्य प्रदेश ), आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा ( वय 24, रा. जबलपूर, मध्य प्रदेश ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर रस्त्यावरील जमावाने गाडी चालविणाऱ्या या मुलाला बाहेर काढून चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या मुलाला ते पोलिस स्टेशनला घेऊन गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या घटनेतील आरोपी मुलगा हा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. पोलिसांनी त्याला सुट्टीच्या कोर्टात हजर केले. त्यावेळी त्याने अल्कोहोल पिल्याचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करण्यात आल्याने कोर्टाने त्याला काही अटींवर जामीन देखील मंजूर केला आहे.

या सर्व प्रकारामध्ये आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप विविध घटकांकडून केला जात आहे. यामध्ये पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील पुणे पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली. राऊत म्हणाले, पुण्याच्या पोलिस आयुक्तांना ताबडतोप बडतर्फ केले पाहिजे. पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी कोणाला मदत केली.

दोन निष्पाप जिवांचे बळी गेले. एक माजुरडा, दारूडा असा तरूण मुलगा जो एका बिल्डरचा मुलगा आहे. जो बारमध्ये बसून दारू पिताना व्हिडीओमध्ये दिसतोय आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देताय.

भ्रष्ट पोलिस आयुक्त, भ्रष्ट पोलिस यंत्रणा अशा शब्दात राऊत यांनी सुनावले. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे पुण्याला लागलेले कलंक आहे, पोलिस आयुक्त नक्की कोणाला वाचवित आहेत, असेही ते म्हणाले.

या अपघातानंतर स्थानिक आमदार सुनील टिंगरे हे तातडीने पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांनी राजकीय (Political) दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. यावर देखील खासदार राऊत यांनी आमदार टिंगरे यांना सुनावले आहे. ते म्हणाले, गुन्हेगाराला वाचविण्यासाठी पोलिस चौकीत जाणारा तो आमदार देखील तितकाच भ्रष्ट आहे. पोलिस आयुक्तांसमोर जाऊन पुण्यातील जनतेने आंदोलन केले पाहिजे.

दोन तरूण अभियंते एका मस्तवाल मुलाच्या माजुरडेपणामुळे, निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पडले. रस्त्यावर तडफडून मेले. हे आमदार अजित पवार गटाचे आहेत. ते तसेच वागणार, माणुसकी शुन्य लोक आहेत ते.

तुम्ही त्याला पोलिस स्टेशनमध्ये पिझ्झा बर्गर खायला देता. खोटा अहवाल देता. त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशा लोकांवर पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे, असेही खासदार राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT