PMC  Sarkarnama
पुणे

PMC News: पुण्यात शाळेची तीन मजली इमारत PMCकडून जमीनदोस्त: संस्था-खासगी सोसायटी वादात 800 विद्यार्थ्यांचे नुकसान

Pune School Demolition: शाळेची इमारत पाडण्यात येत असल्याचे समजताच अनेक माजी विद्यार्थी शाळेकडे धाव घेतली. अनेकांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

सरकारनामा ब्युुरो

Pune News: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वडगाव शेरीतील शिवराज विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेची तीन मजली इमारत महापालिकेकडून पाडण्यात आली. शाळेची इमारत पाडण्याची कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुमारे आठवडाभर आधी विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते.

वडगाव शेरीतील सोमनाथनगर येथे ग्रेवाल सोसायटी आहे. या सोसायटीच्या सुमारे २० गुंठे मोकळ्या जागेवर शिवराज विद्यामंदिरची इमारत उभारण्यात आली होती. या शाळेत बालवाडीपासून पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग असून सुमारे ८०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. सोसायटी आणि शिक्षण संस्थेमध्ये या जागेवरून मागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन वाद सुरू होता.

या प्रकरणात २०१९ मध्ये न्यायालयाने शाळेची इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोरोना काळातील परिस्थिती लक्षात घेऊन कारवाईसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही शाळा सुरू असल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यानंतर शाळेची इमारत पाडण्याचे आदेश सात दिवसांपूर्वी देण्यात आले.

महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता भूषण कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा यापूर्वीच नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांनी आठवणींना दिला उजाळा

शिवराज विद्यामंदिर या शाळेतून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहे. शाळेची इमारत पाडण्यात येत असल्याचे समजताच अनेक माजी विद्यार्थी शाळेकडे धाव घेतली. अनेकांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरही आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज ठाकरेंनी दिली होती भेट

मराठी भाषेसाठी आग्रही असलेले मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी या शाळेला भेट दिली होती. त्यांच्या हस्ते शाळेतील प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे शाळेची इमारत पाडली जात असल्याने विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.

नव्या जागेत शाळा सुरू

शाळा पाडण्याची कारवाई होणार असल्याने शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांचे स्थलांतर केले आहे. सध्या शेजारील दोन खासगी इमारतींमध्ये शाळा सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण सुरू आहे.

‘विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही’

शाळा स्थलांतरित करून नव्या जागेत शिक्षण व्यवस्थित सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्थेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. शाळा स्थलांतरित केल्यानंतरही संस्थेला दरमहा सुमारे एक लाख रुपये भाडे द्यावे लागत असल्याचे सिद्धिविनायक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र साळुंखे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT