BJP vs Shiv Sena politics : भाजपकडून विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गावडे यांच्या उमेदवारीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जोरदार झटका बसला आहे. शिवसेनेकडून दोन उमेदवारांनी उमेदवारीसाठी जोर लावला होता. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा, यासाठी शिंदेंनीही ताकद लावली होती. पण अखेर भाजपने बाजी मारली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीमध्येही सुरूवातीपासून मोठी रस्साखेच होती. या मतदारसंघासाठी शिवसेना प्रचंड आग्रही होती. शिंदे हे स्वत: त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. त्यामुळे संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. अखेर भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेत शिवसेनेचा पत्ता कट केला आहे.
भाजपने पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापुरातील श्री विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आग्रही होते, अशी चर्चा होती. उच्चशिक्षित असलेले कौस्तुभ गावडे हे काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातच कार्यरत असल्याने भाजपकडून त्यांना झुकते माप देण्यात आल्याचे सांगितले जाते.
मतदारसंघातून २०२० मध्ये काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी झाले होते. यावेळीही पक्षाने त्यांच्यावरच विश्वास दाखविला आहे. त्यामुळे गावडे यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले मंगेश चिवटे हे महायुतीत बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यांनी ६ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.
चिवटे हे एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू मानले जातात. शिदे मुख्यमंत्री असताना चिवटे हे त्यांचे ओएसडी होते. तसेच मुख्यमंत्री वैद्यकी सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्याच उमेदवारीसाठी शिंदेंनी ताकद लावल्याची चर्चा होती. पण भाजपने राजकीय वाटाघाटीत शिंदेंचे नामोहरम केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता शिंदे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.