NCP MLA Sunil Shelke celebrating the grand victory in Maval. Party workers dedicated the win to late leader Ajit Pawar. sarkarnama
पुणे

Maval Panchayat Samiti : मावळात राष्ट्रवादीच्या लाटेत भाजपचा धुव्वा : सुनील शेळकेंकडून लगेचच पंचायत समितीच्या सभापती अन् उपसभापतींची घोषणा

Maval Panchayat Samiti : मावळात राष्ट्रवादीने १५-० असा विजय मिळवत भाजपची २५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. हा विजय त्यांनी दिवंगत अजितदादांना समर्पित केला आहे.

Hrishikesh Nalagune

Maval Panchayat Samiti : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ तालुक्यातील 5 गट आणि 10 गण अशा सर्व 15 जागांवर दणदणीत विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. तसेच गेल्या 25 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. या निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळवता आली नाही.

विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल-भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव केला. तर, काही कार्यकर्ते अजित पवार यांच्या आठवणींनी भावनिक झाल्याचे दिसून आले. यानंतर आमदार सुनील शेळके यांनी लगेचच सभापतीपदी चांदखेड गणातून विजयी झालेल्या सुनीता येवले, तर उपसभापतीपदी सोमाटणे गणातील साहेबराव कारके यांची नावे जाहीर केली.

यावेळी शेळके म्हणाले, ‘‘इतिहासात प्रथमच जनतेने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवून मोठ्या फरकाने विजयी केले. हा विश्वास कायम ठेवत पुढील 5 वर्षे सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. जो काम करेल तोच जनतेचा नेता ठरेल.’’ मावळला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवून देण्याचाही त्यांनी निर्धार व्यक्त केला.

13 ठिकाणी एकतर्फी विजय :

प्रचारातील चुरस लक्षात घेता काही मतदार संघात भाजप उमेदवार चांगली लढत देतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, 2 मतदार संघांचा अपवाद वगळता इतर सर्व 13 मतदार संघांमध्ये पूर्णपणे एकतर्फी लढत झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवून भाजपला 15-0 असा ‘व्हाईटवॉश’ दिला.

2 जागांनी वाढवली होती धडधड :

सोमाटणे पंचायत समिती गणाचा अपवाद वगळता सर्व मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली व प्रत्येक फेऱ्यागणिक ती वाढवत नेली. इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवी दाभाडे व भाजपच्या उमेदवार मेघा भागवत यांच्यात शेवटपर्यंत चढाओढ सुरू होती. काही फेऱ्यांची फेर मतमोजणीही झाली. अखेर दाभाडे यांनी ६०९ मतांनी विजय मिळवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT