Pune News, 18 Mar : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. पुणे जिल्हा परिषदेत बहुमत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी दौंड तालुक्यातील वीरधवल जगदाळे, तर उपाध्यक्षपदासाठी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांना संधी देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकारण हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीभोवती फिरताना पाहायला मिळत होतं. अनेक दिग्गज नेते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावत होते. मात्र गेली तीन टर्म जिल्हा परिषदेत असलेले दौंडमधील वीरधवल जगदाळे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर होते.
याशिवाय बारामतीमधील करण खलाटे, ज्येष्ठ सदस्य मुळशीतील शांताराम इंगवले, भोर तालुक्यातील विक्रम खुटवड, आंबेगावमधील माजी उपाध्यक्ष राहिलेले आणि दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील या इच्छुकांची नावे चर्चेत होती. तसेच दौंडमधून माजी आमदार रमेश थोरात हे त्यांचे चिरंजीव तुषार थोरात यांच्यासाठी आग्रही होते.
मात्र वीरधवल जगदाळे यांचे नाव काही दिवसांपूर्वी जवळपास निश्चित झालं होतं. त्या नावाला जास्त विरोध देखील झाला नाही. त्यामुळे बहुतांश नेत्यांनी अध्यक्ष पदाचा नाद सोडून उपाध्यक्ष पद आपल्या जवळच्या व्यक्तीला मिळावं यासाठी ताकद लावली होती. इंदापूरमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील आपल्या मुलीसाठी उपाध्यक्ष पद मिळावं यासाठी आग्रही होते.
यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात लॉबिंग देखील केल्याचं बोललं जात होतं. त्या सोबतच मुळशीतील ज्येष्ठ सदस्य शांताराम इंगवले यांना उपाध्यक्ष पद मिळावं यासाठी स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी चांगलाच जोर लावला होता. दुसरीकडे आंबेगावमधून दोन नावं चर्चेत होती. माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील आणि विष्णू हिंगे.
उपाध्यक्ष पदाबाबत आज सकाळी मुंबईमध्ये बैठक देखील झाल्याचं सांगितलं जातं आहे. या बैठकीला मंत्री दत्तात्रय भरणे, दिलीप वळसे पाटील आणि पार्थ पवार उपस्थित होते. या बैठकी दरम्यान इंदापूरात आधीच पद असल्याने आणखीन एक पद घेण्यासाठी दत्तात्रेय भरणे हे इच्छुक नव्हते.
मुळशीमधून जरी इंगवलेंसाठी जोर लागला असला तरी त्यांचं नाव सुरुवातीलाच मागे पडलं. तर दुसरीकडे अध्यक्ष पदाला हुलकावणी मिळाल्याने उपाध्यक्ष पद हे आंबेगावला देण्याबाबत निर्णय जवळपास निश्चित झाल्यानंतर सुरुवातीला हे पद विष्णू हिंगेंच्या पदरात पडेल असं वाटत असतानाच सलग दुसऱ्यांदा हे पद विवेक वळसे पाटील यांच्या पदरात पडले. तर आता विवेक यांना सलग दुसऱ्यांदा उपाध्यक्ष पद मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.