NCP Majority Pune ZP News : जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता अध्यक्ष व सभापतिपदासाठी कुणाची वर्णी लागणार, याबाबत ग्रामीण भागात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यंदा अध्यक्षपद खुले असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी अनुभवी सदस्यांवर विश्वास दाखवणार की नवख्या चेहऱ्यांना संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या 73 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 51 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यानंतर अध्यक्षपदाबाबत चर्चा सुरु झाली आहे. विजयी उमेदवारांच्या नावांचे गॅझेट बुधवारी (ता. 11) प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे लवकरच अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल.
अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पक्षवाढीचा मुद्दा निकष ठरल्यास, ज्या तालुक्यांत राष्ट्रवादीचा आमदार नाही अशा भागांकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये जुन्नर, पुरंदर आणि खेड तालुक्यांचा समावेश होऊ शकतो. आतापर्यंत अध्यक्षपदाची संधी न मिळालेल्या तालुक्यांना संधी देण्याचा निर्णय झाल्यास मावळ तालुक्याचा प्रथम विचार होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी अध्यक्ष निवडीच्या चर्चांवेळी दिवंगत अजित पवार यांनी, ‘ज्या तालुक्यातून सर्वाधिक जागा निवडून येतील, त्या तालुक्यांना संधी देणार, ’ असे सूचक वक्तव्य केले होते. या निकषांनुसार बारामती, इंदापूर, मावळ आणि राजगड तालुक्यांतील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. याशिवाय अनुभवी आणि तरुण सदस्य असेही दोन निकष असल्याची माहिती आहे.
अनुभवी सदस्यांचा विचार झाल्यास दौंडमधील वीरधवल जगदाळे, मुळशीतील शांताराम इंगवले, तसेच आंबेगावमधील विवेक वळसे पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिरूर तालुक्यातून माजी सभापती सुजाता पवार व भोर तालुक्यातील विक्रम खुटवड यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.
यासोबतच तरुण व नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अंकिता पाटील, प्राजक्ता दुर्गाडे, करण खलाटे, तुषार थोरात, यशराज जगदाळे, तसेच सुनीता बुट्टे पाटील आदींच्या नावांची चर्चा सुरू आहे. यापूर्वीही पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांना संधी देण्यात आल्याची उदाहरणे असल्याने यंदाही अध्यक्षपद किंवा एखाद्या विभागाचे सभापतिपद नव्या चेहऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा परिषदेत इंदापूर तालुक्यातील सर्वच 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकत आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. सन 2017 च्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादीला 4, तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र राष्ट्रवादीने मोठी झेप घेत सर्व जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय बारामती तालुक्यातून 6, तर मावळ तालुक्यातून 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत.
दौंड तालुक्यात भाजपचे आमदार असतानाही 7 पैकी 6 जागांवर राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आले आहेत. तसेच, माजी आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यानंतरही राजगड तालुक्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या तालुक्यांतून निवडून आलेल्या सदस्यांपैकी एखाद्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.