

Pune ZP Election Khed Result News : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 5 आणि पंचायत समितीच्या 16 पैकी 9 जागांवर विजय मिळवत माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या स्थानिक राजकारणातील वर्चस्वालाही काळे यांनी सुरुंग लावला आहे.
या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणूक मैदानात उतरली होती. दोन्ही पक्षांनी सर्वच गट व गणांमध्ये उमेदवार उभे केले होते. यामुळे निवडणुकीची मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातच दिसली. भाजपच्या हाती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही निराशा आली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने 8 पैकी 5 जागा जिंकल्या तर. तर 3 जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली. खेड तालुका पंचायत समितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकला. पंचायत समितीच्या 16 पैकी 9 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 6 जागांवर गुलाल उधळता आला.
तालुक्यातील सर्वात लक्षवेधी लढत पाईट- आंबेठाण गटात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील यांच्या विरोधात आमदार बाबाजी काळे यांची बहीण राजश्री जैद उभ्या होत्या. दहाव्या फेरीअखेर जैद 228 मतांनी पुढे होत्या. त्यामुळे प्रत्येक फेरीगणिक उत्कंठा वाढत होती. मतमोजणी संपली तेव्हा बुट्टे पाटील अवघ्या 401 मतांनी विजयी झाल्या.
वाडा-वाशेरे गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विठ्ठल वनघरे दहाव्या फेरीअखेर शिवसेनेच्या संतोष सुपे यांच्यापेक्षा 701 मतांनी पुढे होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर सुपे तिसऱ्या क्रमांकावर होते. मात्र पुढच्या फेऱ्यांमध्ये असा काही उलटफेर झाला की समीर सुपे यांनी संतोष सुपे यांचा 850 मतांनी पराभव केला आणि वनघरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
कडूस - चास गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट आणि पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांच्या पत्नी वसुधा राक्षे यांच्यात थेट सामना झाला. पहिल्यापासून आघाडी घेत घनवट या 2515 मतांनी निवडून आल्या आणि दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाल्या.
रेटवडी-वाफगाव गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दीप्ती भोगाडे यांनी पहिल्यापासून आघाडी घेतली. मात्र, मधल्या टप्प्यात शिवसेनेच्या रोहिणी थिगळे यांनी आघाडी कमी करत त्यांना जेरीस आणले. तरी शेवटी भोगाडे 704 मतांनी विजयी झाल्या. खेड-मरकळ गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विजयसिंह शिंदे यांनी शिवसेनेच्या श्रीनाथ लांडे यांचा 2651 मतांनी पराभव केला.
मेदनकरवाडी - काळूस गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गणेश अरगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि बाजार समितीचे संचालक विनोद ऊर्फ पप्पू टोपे यांचा 1917 मतांनी पराभव केला. नाणेकरवाडी-महाळुंगे गटात राष्ट्रवादीच्या गणेश बोत्रे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवन खराबी यांचा 3410 मतांनी पराभव केला.
कुरुळी - आळंदी ग्रामीण गटातून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची मुलगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार विनया मुंगसे यांनी पहिल्यापासून आघाडी घेत राष्ट्रवादीच्या शीतल येळवंडे यांचा 1932 मतांनी पराभव केला.
पंचायत समितीवरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा चास, वाफगाव, रेटवडी, पिंपळगाव, मरकळ, काळूस, पाईट, नानेकरवाडी व कुरुळी गणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विजय मिळविला, तर वाशेरे, कडूस, मेदनकरवाडी, आंबेठाण, महाळुंगे व आळंदी गणात राष्ट्रवादीने यश मिळवले. वाडा गण शिवसेनेने राखला. ठाकरे शिवसेनेला रेटवडी-वाफगाव व पिंपळगाव-मरकळ या दोन्ही गटातील चारही गणात यश मिळाले.
तर कडूस-चास, मेदनकरवाडी-काळूस, आंबेठाण-पाईट, महाळुंगे-नाणेकरवाडी व कुरुळी-आळंदी ग्रामीण या पाच गटातील प्रत्येकी एका गणात विजय मिळवता आला, तर त्या गटातील दुसऱ्या गणात मात्र घड्याळाचे काटे वेगाने फिरले. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वाडा-वाशेरे गटातील दोन्ही गणांत शिवसेनेचा प्रभाव फिका पडला.
सर्वात लक्षवेधी लढत आंबेठाण गणात झाली. या गणात राष्ट्रवादीच्या श्रद्धा मांडेकर यांनी ठाकरे शिवसेनेच्या रोहिणी पडवळ यांच्यावर फक्त 16 मतांनी निसटता विजय मिळवला, तर महाळुंगे गणात राष्ट्रवादीच्या अश्विनी तरस यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 7377 एवढ्या मोठ्या मताधिक्याने सर्वात मोठा विजय मिळवला.
या यशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची खेड तालुका पंचायत समितीवर पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले. राजगुरूनगर व चाकण नगरपरिषदेत मोठे यश मिळविलेल्या शिवसेनेला मात्र अपयश पदरी पडले. शिवसेनेने 16 पैकी 13 गणांत उमेदवार दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.