Pune News: विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रचार सभांचा धडाका सर्वत्र सुरू आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुणे जिल्ह्यावर ती सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले असल्याचं पाहायला मिळतंय.
आतापर्यंत अजित पवारांनी हडपसर, वडगाव शेरी, पिंपरी चिंचवड,शिरूर आणि भोर या सह अन्य पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा प्रचार दौरा केला आहे. या सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अजित पवारांच्या रविवारी प्रचार दौऱ्यामध्ये भोर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शंकर मांडेकर यांच्यासाठी मुळशी येथे सभा घेतली. त्यानंतर अजित पवारांच्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात दोन प्रस्तावित सभा होत्या.
यंदाच्या प्रचारात पहिल्यांदाच अजित पवार पुरंदर विधानसभा मतदारसंघात प्रचार करणारा असल्याने ते विजय शिवतारे यांच्या बाबत काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष होतं मात्र ऐनवेळी या सभा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नेमकं या समारंभ होण्यामागचं कारण काय याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिंदेची शिवसेना हे एकत्रित महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. असे असताना देखील राज्यामध्ये चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होताना पाहायला मिळत आहेत.
पुरंदर विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून संभाजीराव झेंडे मैदानात आहेत. दोन्ही बाजूने आपणच महायुतीच्या अधिकृत उमेदवार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे यातील नेमका अधिकृत उमेदवार कोण ? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.
अशातच संभाजीराव झेंडे यांच्या प्रचारासाठी रविवारी अजित पवार भेकराईनगर आणि उरुळी देवाची या दोन ठिकाणी प्रचार सभा घेणार होते. प्रचार सभेच्या कार्यक्रमांमध्ये संभाजीराव झेंडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचा उल्लेख केला आहे.
पुरंदर मधील महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले विजय शिवतारे देखील आपण महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत प्रचार करीत आहेत. यामुळे मतदारांमध्ये नेमकं महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण याबाबत संभ्रम आहे.
या मतदारसंघांमध्ये भाजपची नेमकी भूमिका काय? असणार आणि भाजपचा पाठिंबा हा शिंदेंच्या उमेदवारांना असणार की दादांच्या याबाबत देखील वरिष्ठ पातळीवरून अद्याप कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपच्या या चुप्पी मुळे संभ्रम अधिकच वाढला आहे.
अशातच पुरंदरमधील सभे दरम्यान अजित पवार नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. मात्र ऐनवेळी ही सभा रद्द झाली. भोर विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभा संपून अजित पवारांनी पुरंदरला न येता थेट मुंबई गाठली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत असल्याने अजित पवार त्यांच्या भेटीसाठी मुंबईत गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. पुरंदरमधील सभा पुढे ढकलण्यात आली असल्याचे देखील सांगण्यात येते.
महायुतीमधील बेबनाव टाळण्यासाठी ज्या मैत्रीपूर्ण लढती होत आहे, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील अमित शाह यांच्या उपस्थितीत चर्चा करून करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. अमित शहांच्या बैठकीमध्ये पुरंदरचा तिढा सुटणार का याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.