Ashok Pawar-Shrikant Satpute
Ashok Pawar-Shrikant Satpute Sarkarnama
पुणे

राजकारण बाजूला ठेवत भाजप उपाध्यक्षाने केला आमदार अशोक पवारांचा सत्कार!

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार (ashok pawar) यांचे एकेकाळचे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे (bjp) शिरूर तालुका उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आमदार पवारांचा जाहीर सत्कार केला. पवारांनी तळेगाव ढमढेरे येथील नळपाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटींचा निधी नुकताच मंजूर केला आहे, त्याबद्दल सातपुते यांनी सत्कार केला. (Putting politics aside, BJP vice president felicitates MLA Ashok Pawar!)

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील येथील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी येत आहेत. प्रत्येकाला पाणी विकत घ्यावे लागत आहे. आमदार अशोक पवार यांनी नळपाणीपुरवठा योजनेसाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्याबद्दल आमदारांचा सत्कार करीत आहे, असे सातपुते यांनी सांगितले. त्यानंतर सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.

श्रीकांत सातपुते हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे पदाधिकारी होते. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी शिरूर तालुका खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. तसेच, अनेक निवडणुकाही त्यांनी लढविल्या आहेत. काँग्रेसमध्ये त्यांची तोफ कायम कडाडत असायची. त्यावेळी अशोक पवारांनाही त्यांची मोठी राजकीय मदत झाली होती. कालांतराने सातपुते हे पवार यांना सोडून भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपवासी झाले. पाचर्णे आमदार झाल्यानंतर भाजपत प्रवेश केल्याबद्दल सातपुते यांना शिरूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्षपद दिले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पाचर्णे यांचा पवार यांनी पराभव केला. सातपुते सध्या भाजपचे तालुका उपाध्यक्ष आहेत.

दरम्यान, कोरोना काळात गावात कोरोनायोद्धा म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भाजपचे उपाध्यक्ष व संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष संदीप ढमढेरे यांचाही ग्रामपंचायतीतर्फे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ढमढेरे यांचे विशेष कौतुक आमदार पवार यांनी केले. ढमढेरे हे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे कट्टर समर्थक आहेत. रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) शिरूर तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांनीही आमदार पवार यांचा निधीबद्दल सत्कार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT