Rahul Gandhi's MP Disqualification : Praniti Shinde
Rahul Gandhi's MP Disqualification : Praniti Shinde Sarkarnama
पुणे

Rahul Gandhi's MP Disqualification : राहुल गांधींविरुद्धची कारवाई म्हणजे लोकशाहीचा खून; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल !

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : राहूल गांधींविरुद्ध (Rahul Gandhi) तात्काळतेने झालेली कारवाई ही लोकशाहीची गळचेपी आणि मुस्कटदाबीच नाही, तर लोकशाहीची हत्या असल्याची जळजळीत टीका काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आज पिंपरीत केली. भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानेच, हे षडयंत्र भाजपकडून रचले असल्याचा आऱोप त्यांनी केला.

१३ एप्रिल २०१९ ला कोलार येथील राहुल यांच्या वक्तव्याविरोधात याचवर्षी २३ फेब्रुवारीला गुजरातमध्ये खटला दाखल होऊन अवघ्या चार दिवसात त्याचा निकाल येणे, त्यावर लगेच एका दिवसात राहूल यांची खासदारकी रद्द होणे, त्यानंतर लगेच त्यांना शासकीय बंगला सोडण्यास सांगितले जाणे, हे सर्व लोकशाहीविरोधी आहे, असे प्रणिती म्हणाल्या. या फटाफट कारवाईमुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भाजपची हिटलरशाही हा सर्वांचाच प्रश्न असल्याने त्याविरुद्ध आता सर्वांनीच बोलले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मिडीयाची सुद्धा गळचेपी सुरु असून, त्याविरुद्ध बोलण्याचे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमांना केले.

भारत जोडो यात्रेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे नरेंद्र मोदींच्या पायाखालची वाळू सरकली गेल्याने असुरक्षितता आणि भीतीतून त्यांनी राहूल गांधींना अडकावण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यातून प्रथम त्यांची ईडी, सीबीआय चौकशी करण्यात आली, असा दावा प्रणिती यांनी केला.

कितीही दबावतंत्र वापरा, `हम झुकेंगे नही`,असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.या कारवाईविरोधात कॉंग्रेसने देशभर प्रत्येक जिल्ह्यात पत्रकापरिषदा घेतल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रणिती यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, महिला शहराध्यक्षा सायली नढे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.

दुसरीकडे गांधी घराण्याविरुद्ध भाजपवाले अत्यंत खालच्या पातळीवर बोलले, तेव्हा त्यांना गांधींसारखे अपात्र ठरवले गेले नाही, याकडे प्रणिती यांनी लक्ष वेधले. भाजपसारखे खालच्या पातळीवरचे राजकारण आम्ही करीत नसल्याने, तसेच ते करायचेही नसल्याने गांधी घराण्याविरुद्ध भाजपच्या आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्याविरोधात न्यायालयात तक्रार केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ ईडीच्या धाकाने पन्नास खोक्यातून महाराष्ट्रात जनमत नसलेले सरकार स्थापन होते, हे लोकशाहीविरोधात नाही का? ही जनमताची हत्या नाही का? अशी विचारणा शिंदे यांनी केली. ही शोकांतिका असल्याचे त्या म्हणाल्या.

जनमत नसल्यानेच राज्य सरकार महापालिका निवडणुका घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता दंगली घडवून पालिका निवडणूक ते घेतील, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. गेल्या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकारपरिषद घेतली नाही, हा लोकशाहीचा खून नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही, या अहंकारातून हे सारेकाही सुरु आहे, असे ही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT