Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Raj Thackeray : उमेदवार ठरणार होता पण राज ठाकरेंनी थेट मुंबईच गाठली; पुण्यात नेमकं काय घडलं ?

Sudesh Mitkar

Pune Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीकोनातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दोन दिवसीय पुणे दौरा ठरला होता. पुढील दोन दिवस शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार अंतिम करणार असल्याची चर्चा होती. असे असतानाच राज ठाकरे हे बैठक न घेताच मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Raj Thackeray News)

पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेमधून आजी-माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवक इच्छुक आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक साईनाथ बाबर, वसंत मोरे, किशोर शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र कोणाच्याही उमेदवारीबाबत शहर पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुणे लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी राज ठाकरे यांच्या चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अमित यांनी पुणे लोकसभेबाबतचा अहवाल राज ठाकरे यांना सुपूर्त केलेला आहे. मात्र अद्याप त्यावरती कोणताही निर्णय झाला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही दिवसांपूर्वी मनसेने (MNS) जोरदार शक्ती प्रदर्शन करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढला होता. या माध्यमातून मनसेने आगामी लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे. नुकताच मनसेने केलेल्या मागण्यांबाबत विद्यापीठाकडून खुलासा देत बहुतांश मागण्यांवर कार्यवाही करण्याचा आश्वासन दिले आहे. हा एक प्रकारे मनसेचा विजय मानला जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील इच्छुकांपैकी संभाव्य उमेदवार कोण असू शकतो, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) दोन दिवसीय पुणे दौरा करणार असल्याची माहिती होती. ते ३ आणि ४ मार्च रोजी हा दौरा करण्यात आला होता. नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने राज ठाकरे आज तीन वाजता शहर कार्यालयामध्ये पोहोचले.

या बैठकीसाठी शहरातील बहुतांश पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे चित्र राज ठाकरे यांना पाहायला मिळाले. बैठकीसाठी राज ठाकरे शहर कार्यालयात पोहोचले असल्याची बातमी शहरभर पसरल्याने धावत- पळत अनेक पदाधिकारी कार्यालयात पोहोचले. राज ठाकरे नियोजित वेळेवर येऊनही शहरातील महत्त्वाचे पदाधिकारी कोणीच उपस्थित नव्हते.

पदाधिकारी येत असल्याने काही राज ठाकरे यांनी वाट पाहिली. मात्र बहुतांश पदाधिकारी हे अनुपस्थित होते. हे चित्र दिसल्यानंतर राज ठाकरे तडकाफडकी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकाराबाबत मात्र अद्याप शहर मनसेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यात नेमके काय घडले याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT