Raj Thackeray and CM Shinde Sarkarnama
पुणे

Raj Thackeray : राज ठाकरे CM शिंदेंना देणार धक्का; पुणे जिल्ह्यातील बडा नेता मनसेच्या वाटेवर ?

Chaitanya Machale

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकेकाळी एकमेव आमदार अशी ओळख असलेले जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे पुन्हा आपल्या स्वगृही परतण्याची शक्यता आहे. शिवसेनेत उभी फूट पडून राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यानंतर शरद सोनवणे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले होते. सध्या त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. (Raj Thackeray Pune Tour)

गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणात झालेला गोंधळ आणि जुन्नर तालुक्यातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता माजी आमदार सोनवणे पुन्हा मनसेमध्ये परतण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील संकेत स्वत: सोनवणे यांनी दिले आहेत. मंगळवारी आमदार लोकार्पण सोहळ्याला राज ठाकरेंसोबत ते पहायला मिळाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुणे ग्रामीणचा दौरा सुरू केला आहे. राज ठाकरे जुन्नर तालुक्यातील ओझर येथील भक्ती शक्ती शिल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंगळवारी आले होते. त्यावेळी सोनवणे हे ठाकरे यांच्याबरोबर पाहायला मिळाले. त्यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर कार्यक्रमाला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

त्यामुळे शरद सोनवणे पुन्हा मनसेमध्ये येतात की काय ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच सोनवणे यांनी 'राजकारणात कधी काहीही घडू शकते, आगे आगे होता है क्या', अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे हे माझ्यासाठी दैवत असल्याचा पुनरुच्चार देखील आमदार सोनवणे यांनी केला. त्यामुळे सध्याची राजकारणाची झालेली मिसळ बघता राज ठाकरेंना आपल्या जुन्या शिलेदाराची साथ मिळणार का ? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर सोनवणे हे मनसेकडून निवडणूक लढले होते. 'आपला माणूस - शरद सोनवणे', असा प्रचार निवडणुकीत करण्यात आला होता. जुन्नरकरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना 2014 मध्ये विधानसभेत विजयी केले होते. मनसेच्या तिकिटावर विजयी झालेले ते एकमेव आमदार होते. नारायणगाव आळेफाटा या दरम्यान उभारण्यात आलेल्या टोलनाक्याच्या विरोधात आमदार सोनवणे यांनी मोठे आंदोलन करत हा टोल बंद करण्यास भाग पाडले होते.

पक्षात काही मतभेद झाल्यानंतर मनसेला रामराम करत ते शिवसेनेत आले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे असा संघर्ष सुरू झाला. त्यावेळी आमदार सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केले. शिंदे यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली.

एकेकाळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना असताना त्यांच्या पक्षाच्या आशाताई बुचके या सध्या भाजपमध्ये आहेत. त्या जुन्नरमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी अद्यापही आपण शरद पवार यांच्या बाजूने आहोत की अजित पवार यांच्या गटात याचा स्पष्ट खुलासा केलेला नाही. त्यातच सत्यशील शेरकर यांनी शरद पवार यांची भेट घेत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे उमेदवारी द्यायची झाल्यास नक्की कोणाला द्यायची यावरून जोरदार वाद होऊ शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर तिकीट मिळवायचे झाल्यास जुना पक्ष असलेल्या मनसेमधून मोठी संधी मिळू शकते. हे लक्षात घेत माजी आमदार शरद सोनवणे आता मनसेशी जवळीक वाढवत असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काळात सोनवणे नक्की कोठे असतील, यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT