Ramdas Athawale
Ramdas Athawale Sarkarnama
पुणे

Loksabha Election 2024 : लोकसभेला एकही जागा न मिळाल्याने 'आरपीआय'ची उद्याची पुण्यातील बैठक वादळी होणार?

उत्तम कुटे: सरकारनामा

Pune News : लोकसभा निवडणुकीत एनडीएचा घटक पक्ष आणि राज्यातील महायुतीत सामील असूनही आऱपीआयला एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षात प्रचंड नाराजी असून त्याचा स्फोट गुरुवारी पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत होण्याची चिन्हं आहेत. तसेच शिर्डीची जागा पक्षाध्यक्ष रामदास आठवलेंसाठी मागण्याचा ठराव या वेळी केला जाणार असल्याची माहिती "सरकारनामा"ला मिळाली आहे.

पक्षप्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी जर आपला मान ठेवला जात नसेल, तर युतीतून बाहेर पडण्याचाही इशारा देण्याची तयारी काही पदाधिकाऱ्य़ांनी केली असल्याची माहिती समोर आली आहे. पण, आपण एनडीए तथा महायुतीतच राहणार असल्याचे स्वत: आठवलेंनीच यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र, दबावतंत्राचा एक भाग म्हणून आणि नंतर होऊ घातलेल्या विधानसभेला पुरेशा जागा आणि मंत्रिपद द्यावे, यासाठी ही मागणी रेटली जाणार असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाने दोन लोकसभा जागांची मागणी केली होती. त्यातही शिर्डीची जागा आठवलेंसाठी सोडण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह अजून कायम आहे. त्यामुळे ती मिळावी, असा ठराव उद्याच्या बैठकीत केला जाणार आहे. त्याला पक्षाच्या पदाधिकाऱ्यानेही "सरकारनामा"शी बोलताना दुजोरा दिला, तर भाजपने गृहीत धरून एकही जागा लोकसभेला न दिल्याने पक्षात प्रचंड नाराजी असून, ती या वेळी प्रकट होणार आहे, असे दुसऱ्या पदाधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीत विचारातच घेतले नसल्याने काय भूमिका घ्यायची यावर या बैठकीत चर्चा होईल, असे ते म्हणाले.

दुसरीकडे आरपीआयच्या विरोधाला न जुमानता भाजपने मनसेला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हा प्रकार म्हणजे रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या जखमी मनावर मीठ चोळण्यासारखे असल्याने त्याचेही पडसाद या बैठकीत उमटणार आहेत. कारण त्याचे संकेत सोशल मीडियावर अगोदरच मिळाले आहेत. म्हणून त्याची तातडीने दखल घेत आठवलेंनी ही बैठक बोलावली आहे. त्यामुळे त्यात काय होते, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT