Pimpri:आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने (Thackeray Group) आपल्या १७ उमेदवारांची यादी जाहीर करीत बुधवारी (ता.२७) राज्यात आघाडी घेतली. फक्त नावाच्या घोषणेची औपचारिकता राहिलेले मावळचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील (Sanjog Vaghere Patil) यांचा या लिस्टमध्ये समावेश आहे. मावळ हा गड (Maval Lok Sabha 2024) पक्षाकडेच कायम राहील, अशी खात्रीलायक प्रतिक्रिया वाघेरेंने उमेदवारी जाहीर होताच 'सरकारनामा'ला दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि शिवसैनिकांचे आभार या उमेदवारीबद्दल वाघेरेंनी मानले. आघाडीत मावळ कुणी लढवायचा याविषयी शिरूरसारखा संभ्रम नव्हता. त्यामुळे तेथे उमेदवारीविषयी रस्सीखेचही नव्हती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनेकडे असलेली ही जागा त्यांच्याकडेच यावेळीही कायम राहिली. त्याची आणि आपल्या उमेदवारीची खात्री असल्याने वाघेरेंनी यापूर्वीच प्रचाराला धडाक्यात सुरुवात केली होती. कारण त्याच अटीवर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळेच ठाकरेंनी घाटाखालील पनवेलमधील जाहीर सभेत तेच उमेदवार असतील,असे सांगितले होते. त्यावर आज त्यांच्या पक्षाने शिक्कामोर्तब केले. आता युतीचा उमेदवार (शिंदे शिवसेनेचे श्रीरंग बारणे) उद्या (ता.२८) जाहीर होणार आहे.
पुणे जिल्ह्यात एकमेकांना लागून असलेल्या मावळ, शिरूर लोकसभेत यावेळच्या लोकसभेला एक समानता दिसून आली आहे. दोन्हींकडचे दोन प्रमुख उमेदवार (शिरूरला युतीचा, तर मावळात आघाडीचा) हे आयात आहेत. मावळात आज उमेदवारी जाहीर झालेले वाघेरे हे नुकतेच अजित पवार राष्ट्रवादीतून ठाकरे शिवसेनेत गेलेले आहेत. ते पिंपरी-चिंचवडचे पक्षाचे माजी अध्यक्ष आणि शहराचे माजी महापौर होते, तर शिरूरला अजित पवार राष्ट्रवादीत कालच शिंदे शिवसेनेतून आलेले उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांची उमेदवारी कालच जाहीर झालेली आहे. ते तेथे तीन वेळा खासदार राहिलेले आहेत.
शिरूरची यावेळची लढत ही २०१९ चे मुख्य प्रतिस्पर्धी आढळराव आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यातच पुन्हा होणार आहे, तर इकडे मावळातही ती गतवेळेसारखी घाटावरील दोन मुख्य उमेदवारांतच आहे. २०१९ च्या लोकसभेला बारणे विरुद्ध पार्थ अजित पवार अशी ती झाली होती. या वेळी ती बारणे आणि घाटावरील वाघेरे यांच्यात होणार आहे. हे दोघेही पिंपरी- चिंचवडचेच आहेत. त्यामुळे मावळचा पुढील खासदार हा घाटावरचा व उद्योगनगरीचाच असणार आहे. या वेळी बारणे हे खासदारकीच्या हॅटट्रिकवर असून, ती चुकविण्याची संधी वाघेरेंकडे आहे.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.