Pune News: महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सध्या तिच्या कारच्या अपघातामुळे चांगलीच अडचणीत सापडली आहे.तिच्या गाडीनं दिलेल्या जबर धडकेत रिक्षाचं मोठं नुकसान झालं असून चालकही गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर गौतमी पाटील आणि तिच्या टीमवर गंभीर आरोप केले जात आहेत. यामुळे राजकीय वातावरणही तापलं आहे. याचदरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी गौतमीची बाजू घेत आपली या अपघात प्रकरणावर भाष्य केलं आहे.
सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील (ShahajiBapu Patil) यांनी गौतमी पाटील प्रकरणावर सोमवारी(ता.6) प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, त्या गाडीत सेलिब्रेटी होती, म्हणून इतका भपका करायची गरज नाही. ड्रायव्हरला अटक झाली, गुन्हा दाखल झाला आहे.गाडी जप्त झाली आहे.कोर्टातून नुकसान भरपाई मिळेल. हा मुद्दा एवढा मोठा करायची काय गरज असा सवालही शहाजी बापूंनी केला आहे.
पुढे शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली. गाडी मालकांनी ड्रायव्हरच ठेवायचं बंद करावे.मालकांनी गाड्या चालवल्या पाहिजेत.आता गौतमीला सांगा,तूच गाडी चालव. दहाच्या स्पिडने हळूहळू जा, म्हणजे कार्यक्रमाला ती आज बुकिंग केले की, ती चार दिवसांनी पोहोचेल. एवढा बारका मुद्दा एवढा मोठा करु नका.ती गरीब बिचारी रातभर झोपली नसेल,असं काळजीवाहू सूरही पाटील यांनी गौतमी पाटीलबाबत (Gautami Patil) आळवला.
ते म्हणाले, त्या बिचाऱ्या गौतमी पाटीलला कशाला ताप देताय.तिच्या ड्रायव्हरने अपघात केलाय तो विषय संपलाय.गाडीत ती होती म्हणतात, कोण नव्हती म्हणतंय.पण ड्रायव्हरकडून अपघात झाला तर मालकाला आत टाकून दोघांनी भांडणे करायची का?.‘ड्रायव्हर चुकला की कोण चुकलंय हे पोलिस पाहतील असंही माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठणकावलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी अपघात झाल्यामुळे एक व्यक्ती मरणाच्या दारात असताना नैतिकतेच्या दृष्टीने गौतमी पाटील यांनी त्यांची भेट घेणं आवश्यक होतं. मात्र,तसं झालं नाही.या सर्व प्रकरणांमध्ये प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या दृष्टिकोनातून गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे.
एक व्यक्ती मृत्यूच्या दारात असताना गौतमी पाटील या त्या कुटुंबाची भेट घेत नाही, त्यांचा उपचाराचा खर्च करत नाहीत. त्या उलट त्या जर इतरत्र त्यांचे शो करत असतील,तर हे अत्यंत दुर्दैवी आहे.सर्व प्रकरणाचा तपास करून गौतमी पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे.पाटील जर चुकीचं वागत असेल ,तर त्यांना कायद्याचा बडगा दाखवणे आवश्यक आहे.त्याला कुठेतरी पोलिसांकडून उशीर होत आहे, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता.
गौतमी पाटीलच्या वाहनाचा पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ मंगळवारी (ता.30 सप्टेंबर) रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात उभ्या असलेल्या रिक्षाला गौतमी पाटीलच्या वाहनानं पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे रिक्षानं तीनवेळा पलटी मारली.या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
यानंतर गौतमीच्या टीमनं नुकसान भरपाई दिलीच नाही,शिवाय साधी चौकशीही केली नसल्याचा आरोप करत या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी अपघातग्रस्त परगळे कुटुंबियांनी केली होती.तसेच गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी त्यांनी सिंहगड पोलिस स्टेशन गाठत केली होती. पोलिसांनी वाहनचालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पण याप्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला क्लिन चीट दिली आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.