Pune LokSabha Constituency : Pune Political News  Sarkarnama
पुणे

Pune Politics: धंगेकर म्हणतात युती तुटली अन् सावंत म्हणतात नाही; पुण्यात शिवसेनेनं नेमका काय घोळ घातला?

Pune Politics: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता, दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज भरण्याची मुदत होती.

Amit Ujagare

Pune Politics: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज भरण्याची मुदत असल्यानं सकाळपासूनच पक्षांकडून अधिकृत उमेदवाराला एबी फॉर्म देण्यामध्ये गोंधळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे शिवसेना-भाजपमध्ये हा घोळ झाला आहे. शेवटपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटू न शकल्यानं शिवसेनेचे महानगर प्रमुख रविंद्र धंगेकर यांनी युती तुटल्याचं जाहीच करुन टाकलं. पण नंतर लगेचच मंत्री उदय सामंत यांनी अजूनही युती कायम असल्याचं सांगताना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मीच सांगतोय म्हणजे युती कायम आहे, असं ठणकावून सांगितलं. पण यामुळं शिवसेनेनं नेमका काय घोळ घातला जाणून घेऊयात.

पुण्यात भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरुन एकमत होत नव्हतं. भाजपनं केवळ १५ जागांवर शिवसेनेची बोळवण केली. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांना विविध प्रकरणांमध्ये टार्गेट करणाऱ्या धंगेकरांना भाजपनं बैठकीसाठी देखील येऊ दिलं नव्हतं. तसंच जर धंगेकर जागा वाटपाच्या बैठकीला आले असते तर १५ जागाही शिवसेनेला मिळाल्या नसत्या अशा पद्धतीचं विधान भाजपच्या नेत्यांकडून केल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. यातून धंगेकरांविरोधात पुणे भाजपच्या नेत्यांच्या मनात राग असल्याचं प्रतित होतं.

दरम्यान, जागा वाटपाचा तिढा अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल रात्री उशीरापर्यंत सुटू शकला नव्हता. त्यामुळं रविंद्र धंगेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर चर्चाही झाली, पण नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकलं नाही. म्हणजेच भाजप-शिवसेना युती धोक्यात असल्याचं हे द्योतक होतं. त्याचमुळं दुसऱ्या दिवशी शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांना अर्जांचं आणि एबी फॉर्मचं वाटप सुरु करण्यात आलं. त्याचवेळी धंगेकरांनी आधी युती तुटल्याचं जाहीर केलं. त्यानंतर मात्र युतीबाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, उदय सामंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, पुण्यात भाजप-शिवसेना युती तुटली का? तर नाही असं उत्तर सामंत यांनी दिलं. युती झाल्याची किंवा तुटल्याची घोषणा कोण करतं? तर ते पक्षाचे मुख्य नेते करतात. त्यामुळं एकनाथ शिंदेच युतीबाबतची घोषणा करतील त्यांच्या वतीनं मी आज इथं आलो आहे तर त्यांनी मला सांगितल्याचं मी इथं जाहीर करतो आहे की, पुण्यात युती तुटलेली नाही. आमच्या पदाधिकाऱ्यांनी भावनेच्या भरात युती तुटल्याचं सांगितलं असेल तर खरंतर युती तुटलेली नाही, असं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

पण नेमकी युती आहे की नाही? हा घोळ निर्माण झाल्यानं शिवसेनेनं पुण्यात जागा वाटपांचा घोळ घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. याचाच अर्थ शिवसेनेच्या नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट झालं आहे. स्थानिक नेता म्हणून रविंद्र धंगेकर आपल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडं पक्षाचे वरिष्ठ नेते मात्र स्थानिक परिस्थितीनुसार धंगेकरांना फ्री हँड देताना दिसत नाहीएत. त्यामुळंच शिवसेनेनं नक्कीच पुण्यात भाजपशी बोलणी करताना घोळ घातला असल्याचं ठळकपणे स्पष्ट होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT