Sambhajinagar Municipal Election : महापालिकेसाठी शेवटपर्यंत ताणल्याने अखेर शिवसेना-भाजपची युती तुटली. सोमवारी रात्री उशीरापर्यंत घडलेल्या नाट्यानंतर मंगळवारी सकाळी शिवसेनेचे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपचा हट्ट आणि अहंकारापायी युती तुटल्याचे जाहीर केले. युती तोडण्याचे खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर फोडण्यात आल्यानंतर ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी थेट संजय शिरसाट यांच्यावरच हल्ला चढवला. आम्ही कार्यकर्त्यांसाठी भांडत होतो, तर ते आपल्या मुला-मुलीला सेट करण्यासाठी म्हणून युती तुटली असा पलटवार केला.
भाजपकडून शिवसेनेला 37 जागांचा प्रस्ताव दिला होता. दोन्ही बाजूंनी एकमत झाल्यावरही त्यांच्याकडून अमूक प्रभागातून हा उमेदवार बदला, तमूक ठिकाणची जागा आम्हाला द्या, अशा मागण्या केल्या जात होत्या. अनेक ठिकाणी युती करायची म्हणून आम्ही आमच्या सिटिंग जागा त्यांना दिल्या. परंतु अखेरपर्यंत त्यांच्याकडून बदल आणि वाढीव जागांची मागणी सुरूच होती. प्रभाग 8 मध्ये आमच्या कैलास गायकवाड यांची जागा ते मागत होते, त्याला आम्ही विरोध दर्शवला. सगळ्या जागा त्यांना द्यायच्या तर मग आम्ही काय करायचे?
आम्ही कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून शेवटपर्यंत भांडत होतो, तर ते मात्र आपला मुलगा, मुलगी, नातेवाईकांना सेटल करण्यासाठी प्रयत्न करत होते, असा थेट आरोप अतुल सावे यांनी संजय शिरसाट यांच्यावर केला. आम्ही दुपारपर्यंत ज्या जागांवर एकमत झाले होतो, त्या उमदेवारांनाही एबी फाॅर्म दिले नव्हते. त्यांच्याकडून युती तोडण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर दुपारी बारानंतर आम्ही ते दिले. आता युती तुटल्यामुळे 37 उमेदवारांची यादी फायनल करून त्यांना आम्हाला एबी फाॅर्म द्यायचे आहेत, असे अतुल सावे यांनी सांगितले.
शिवसेना-भाजपची युती व्हावी, अशी आमची प्रामाणिक इच्छा होती. त्यासाठी आमच्याकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले गेले. पण काल एका प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) आम्हाला कुठलाही संपर्क साधला गेला नाही. अहंकार कोणाला होता हे यावरून स्पष्ट होते. युती तुटल्याचा फटका सहाजिकच आम्हाला आणि त्यांनाही बसणार आहे. पण आता त्या परिस्थितीला तोंड देण्यावाचून पर्याय उरलेला नाही. आम्ही 87 जागांवर लढत आहोत, असे सावे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपचे खासदार भागवत कराड यांना पक्षाने उमेदवारी देऊ केली होती. परंतु आमदार, खासदारांच्या मुलांना तिकिटे देऊ नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कराड यांचे सुपुत्र हर्षवर्धन कराड यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.