Sarkarnama
पुणे

​Revenue Department decision : महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय! सातबारा उताऱ्याबाबतचा ‘हा’ नियम बदलला; शेतकऱ्यांचा त्रास कायमचा संपला!

Revenue Department latest decision for farmers : महसूल विभागाने सातबारा उताऱ्यासंदर्भातील महत्त्वाचा नियम बदलला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची कागदपत्रांची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. नवीन नियम काय आहे, कोणाला फायदा होणार आणि याचा परिणाम काय होईल, जाणून घ्या.

Sudesh Mitkar

Pune News : महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावरील फेरफार प्रक्रियेला पूर्णपणे डिजिटल स्वरूप दिले आहे. आता अतिरिक्त महसूल आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या अर्धन्यायिक आदेश थेट ऑनलाइन तलाठ्यांच्या कार्यालयात पोहोचतील. आदेश मिळताच एका क्लिकवर फेरफार नोंद होणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे आणि कार्यालयीन विलंब संपुष्टात येणार आहे.

यापूर्वी ही प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन होती. शेतकर्‍यांना आदेशाची सत्यप्रत मिळवून ती तलाठ्याकडे सादर करावी लागत होती. अनेकदा सत्यप्रत मिळण्यास विलंब होत असल्याने फेरफार नोंदी महिनोनमहिने लांबणीवर पडत होत्या. शिवाय नोटीस न मिळाल्याच्या तक्रारीही वारंवार येत होत्या. नव्या व्यवस्थेनुसार आता आदेशासोबत संबंधित पक्षकारांना ऑनलाइन नोटीसही थेट पाठवली जाणार आहे. तलाठ्याकडे आदेश पोहोचल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करणे बंधनकारक राहील.

‘ई-क्यूजे कोर्ट’ प्रणालीशी जोडणी

अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या अर्धन्यायिक महसूल न्यायालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘ई-क्यूजे कोर्ट’ प्रणालीशी ही नवीन व्यवस्था जोडण्यात आली आहे. प्रणालीमध्ये आदेश तयार होताच संबंधित गट क्रमांकाच्या सातबारा उताऱ्यावरील फेरफार प्रक्रिया आपोआप सुरू होईल. शेतकरी आणि इतर पक्षकारांना आदेश ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याने पारदर्शकता वाढेल.

जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमी अभिलेख शैलेश नवाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, महसुली आदेशांवरील फेरफार प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन झाल्यामुळे शेतकऱ्यांना कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. आदेश तलाठ्यांकडे थेट पोहोचेल आणि पक्षकारांनाही तत्काळ ऑनलाइन नोटीस मिळेल. यामुळे फेरफार प्रक्रियेत वेग, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे.

डिजिटल व्यवस्थेमुळे आदेशाची सत्यप्रत मिळवणे, तलाठ्याकडे सादर करणे आणि सतत पाठपुरावा करण्याची शेतकऱ्यांची ससेहोलपट संपुष्टात येणार आहे. महसूल विभागाने केलेल्या या सुधारणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT