Sanjay Chitare  sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीतील प्रस्थापितांच्या मनमानीमुळे रिक्षावाला ठरला ३५ दिवसांचा उपनगराध्यक्ष!

रिक्षाचालक संजय चितारे यांना दिला दौंडच्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा

प्रफुल्ल भंडारी

दौंड (जि. पुणे) : दौंड (daund) नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदावर संधी मिळालेल्या रिक्षावाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमधील (ncp) प्रस्थापित नगरसेवकांच्या मनमानीमुळे व दुसऱ्याला संधी देण्यामुळे केवळ ३५ दिवस या पदावर काम करता आले. कालावधी कमी असला तरी शब्दाला जागणारा रिक्षावाला, अशी त्यांची राजकीय पटलावर नोंद झाली आहे.

दौंड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले संजय गणपत चितारे यांची उपनगराध्यक्षपदी २ डिसेंबर २०२१ रोजी बिनविरोध निवड झाली होती. नगरपालिकेत उपनगराध्यक्ष हे पाणीपुरवठा समितीचे पदसिद्ध सभापती असल्या कारणाने या पदाला शहर व शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीत महत्व आहे. त्यांच्या निवडीचा आनंद असतानाच डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात खडकवासला धरणातून आवर्तन न आल्याने ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईची स्थिती उद्‌भवली होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशामुळे आवर्तन मिळाल्याने शहरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली. दरम्यान पक्षांतर्गत ठरल्यानुसार चितारे यांनी ५ जानेवारी २०२२ रोजी स्वतः हून राजीमा दिला.

राजीनाम्याविषयी विचारले असता संजय चितारे म्हणाले, ‘‘उपनगराध्यक्षपद आठ दिवसासाठी दिले तरी चालेल, असे मी बोललो होतो. नेतेमंडळींनी विश्वासाने माझी निवड केल्याने त्यांना दिलेल्या शब्दाचा मान राखला. चांगल्या भावनेने दुसऱ्याला अडथळा नको म्हणून स्वत:हून राजीनामा दिला आहे. मिळालेल्या संधीबद्दल मी समाधानी आहे.’’

दौंड नगरपालिकेत जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा या नागरिक हित संरक्षण मंडळाच्या सदस्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना या नोंदणीकृत गटाचे निवडून आलेले १४ व २ स्वीकृत, असे एकूण १६ सदस्य आहेत. नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी या नोंदणीकृत गटाचे निवडून आलेले १० सदस्य व १ स्वीकृत, असे एकूण ११ सदस्य आहे.

राष्ट्रवादी पक्षांतर्गत उपनगराध्यक्षपदावर पहिल्या तीन वर्षांत तीन जणांना प्रत्येकी एक वर्ष आणि त्यानंतरच्या दोन वर्षात चार जणांना प्रत्येकी सहा महिने, असे एकूण सात जणांना संधी देण्याचे ठरले होते. पहिल्य वर्षी शिवसेनेच्या हेमलता परदेशी व त्यानंतर राष्ट्रवादीचे राजेश जाधव, वसीम शेख, विलास शितोळे व संजय चितारे यांनाच पाच वर्षात संधी मिळाली. परंतु काहींनी वर्षापेक्षा अधिक काळ पद राखल्याने संजय चितारे यांना ३५ दिवसांवरच समाधान मानावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT