Maharashtra Rojgar Mahakumbh September 29 Sarkarnama
पुणे

Maharashtra Job Fair 2026: नोकरी हवीय? 29 सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा! राज्यभर रोजगार महाकुंभ; पुण्यात 30 ठिकाणी मेळावे

Rojgar Mahakumbh September 29: ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’ अंतर्गत २९ सप्टेंबरला एकाच दिवशी राज्यात ५०० हून अधिक रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत.

Mangesh Mahale

Pune News : नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातील युवक-युवतींसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात १०वी, १२वी, आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांपासून पदवीधरांपर्यंतच्या युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार असून, मुलाखतीचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसह (आयटीआय) तब्बल ८०० ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयावर (डीव्हीईटी) आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांची नोंदणी आणि त्यांना मेळाव्यात सहभागी करून घेण्याची जबाबदारी संबंधित आयटीआयच्या निदेशकांकडे देण्यात आली आहे.

युवकांना नोकरीसोबतच स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’अंतर्गत २९ सप्टेंबरला एकाच दिवशी राज्यात ५०० हून अधिक रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत.

पुणे जिल्ह्यातही या उपक्रमाची तयारी करण्यात आली असून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून विविध तालुक्यांतील ३० शैक्षणिक संस्थांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांमध्ये विविध उद्योग, कंपन्या आणि आस्थापनांचा सहभाग राहणार आहे.

उद्योगांकडून उपलब्ध असलेल्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि संबंधित रोजगाराच्या स्वरूपानुसार केली जाणार आहे. त्यामुळे आपापल्या पात्रतेनुसार नोकरीच्या संधी शोधणाऱ्या युवकांना या मेळाव्याचा फायदा होऊ शकतो.

युवकांना अधिकाधिक रोजगारक्षम बनविण्यासोबतच उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून विविध कौशल्यविकास उपक्रम राबविले जात आहेत. रोजगार महाकुंभ हा त्याच प्रयत्नांचा एक भाग असून युवक आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे-११ येथे संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ आहे. रोजगारासंबंधी अधिक माहितीसाठी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT