Rupali Chakankar , Rupali Thobare Patil  Sarkarnama
पुणे

Rupali Chankankar : रुपाली चाकणकरांनी माहेरी धाडलं, तरीही रुपाली पाटील सासरीच राहिल्या...

Rashmi Mane

NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाला हातभार लावून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गोटात दाखल झालेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे अध्यक्षपदही आपल्याच पदरात ओढले. यानिमित्ताने रुपालीताईंनी आयोगातून सरकारी यंत्रणेवर आणि महिला आघाडीच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून पक्षावर हुकूमत राखली. आयोगाचा कारभार सांभाळतानाच रुपालीताईंनी अजितदादांच्या नेतृत्वात पक्षाच्या विस्तारासाठी महिला नेत्यांची फौज उभी केली. त्यानुसार प्रमुख महिला नेत्यांना जिल्हे वाटून दिले. काहीजणींकडे जिल्ह्या-जिल्ह्यांत लक्ष घालण्याचे आदेश दिले.

मात्र, याआधी कधीतरी, रुपालीताईंच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदावर डोळा ठेवून असलेल्या रुपाली पाटलांकडे धाराशिवचा कारभार सोपवला. मुळात, रुपाली पाटील या अजितदादांच्या नेतृत्वात पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्रात काम करण्याच्या तयारीत असतानाच रुपालीताईंनी मात्र रुपाली पाटलांना धाराशिव दाखवले. त्यामुळे रुपाली पाटील काहीशा नाराज झाल्याचे बोलले गेले. ही नाराजी रुपाली पाटलांनी मीडियाकडे उघडपणे बोलूनही दाखवली. या साऱ्यांत गमत अशी आहे, धाराशिव हे रुपाली पाटलांचे आजोळ आणि माहेर आहे; तर पुणे हे त्यांचे सासर !

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाची जबाबदारी देऊन रुपालीताईंनी रुपाली पाटलांना थेट माहेरी धाडले; पण रुपाली पाटील यांनी पुण्यात म्हणजे, सासरीच राहणे पसंत केल्याचे दिसत आहे. परंतु, प्रदेशाध्यक्षांनी नेमणुकीचा आदेश काढून दीड महिना उलटला तरीही, रुपाली पाटलांनी काही धाराशिवचे नाव घेतले नाही अन् गेल्याही नाहीत. उलटपक्षी धाराशिवमध्ये काम करता येणार नसल्याचा सूर ठेवून रुपाली पाटलांनी थेट अजितदादांचे कान भरल्याचे समजते. त्यानंतर मात्र रुपाली पाटलांनी फोनाफोनी करून धाराशिवमधील महिला पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. मुळात, प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार रुपाली पाटलांनी प्रत्यक्षात धाराशिवमध्ये जाऊन पक्षासाठी झटायला हवे; मात्र त्याकडे कानाडोळा करीत, रुपाली पाटलांनी मनाला वाटेल तसे काम सुरू केल्याचे दिसत आहे. अशा प्रकारातून रुपाली पाटलांनी रुपाली चाकणकरांच्या ‘वर्किंग स्टाईल’कडे बोट दाखविण्याची संधी साधल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर आणि सत्तेत गेल्यानंतर अजित पवारांनी पक्षवाढीवर भर दिला आहे. त्यातून रुपाली चाकणकरांकडे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. आधीच आयोगाचे अध्यक्षपद असलेल्या रुपालीताईंनी नव्या पक्षात महिला नेत्यांची नवी टीम उभी केली. राज्यभर पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी त्यांनी डिसेंबर महिन्यांत पक्षातील प्रमुख २६ महिला नेत्यांकडे जिल्हानिहाय कामे करण्याचा आदेश काढला. त्यातून रुपाली पाटलांकडे धाराशिव देण्यात आले. हा आदेश येताच, रुपाली पाटील गोंधळल्या आणि धाराशिवमध्ये काम न करण्याचा पवित्रा घेतला. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावर काही दिवस काही प्रतिक्रिया न दिलेल्या रुपाली पाटलांनी आपली नेमणुकीबाबतची तक्रार अजितदादांकडे मांडली. त्यावर अजितदादांनी समजूत काढल्यानंतर रुपाली पाटलांनी काम करण्याची तयारी ठेवली. फोनवरून नेमणूक मान्य असल्याचे रुपाली पाटलांनी रुपालीताईंना कळविले. त्यानंतर धाराशिवच्या महिलानेत्यांना फोनाफोनी करीत, पक्ष वाढविण्याचे नियोजन केले.

मुळात, आधी रुपालीताई या जुन्या राष्ट्रवादीत आणि रुपाली पाटील मनसेत असताना दोघींची मैत्री होती. मात्र, मनसे सोडून रुपाली पाटलांनी तेव्हाचे (ठाकरे सरकार) उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशाच्या कार्यक्रमात अजितदादांनी रुपाली पाटलांच्या धडाडीचे कौतुक केल्याने ‘हवेत’ गेलेल्या रुपाली पाटलांनी थेट रुपाली चाकणकरांना प्रतिस्पर्धी मानले. राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर, त्यातही अजितदादांचे बळ असल्याने आता महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडे येणार असल्याचे रुपाली पाटलांना वाटू लागले. पुढच्या काळात तसे काही घडले नाही. त्याच काळात रुपाली चाकणकरांकडील महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार विद्या चव्हाणांकडे गेले. त्या काळात रुपाली पाटील थोड्याशा नाराज झाल्या. विद्या चव्हाणही चाकणकरविरोधी; पण रुपाली पाटील नको; त्यापेक्षा विद्याताई कधीही चांगल्या, अशी भावना रुपाली चाकणकरांच्या मनात असावी.

पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पहिल्या दोन दिवसांतच रुपाली चाकणकर या अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेल्या. या पक्षात पुन्हा रुपालीताईंकडे महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद आले. पक्षात चाकणकर याच आपल्या ‘बॉस’ राहिल्याने रुपाली पाटलांचा हिरमोड झाला. प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकणाऱ्या रुपाली पाटलांनी प्रदेश सोडा; राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे पुणे शहराध्यक्षपदच चाकणकरांनी मिळू दिले नाही. त्यानंतर मात्र प्रदेशावरचे प्रवक्तेपद देऊन रुपाली पाटलांची बोळवण करण्यात आली. या घडामोडीनंतर रुपाली पाटलांनी चाकणकरांना छुपा विरोध केल्याचे बोलले गेले. हे सारे जाणून असलेल्या रुपालीताईंनी रुपाली पाटलांना धाराशिवची ‘वाट’ दाखविली असावी, हे नक्की; परंतु रुपालीताईंनी दाखवलेल्या वाटेवरून न जाण्याची खमकी भूमिका रुपाली पाटलांनी घेतल्याचे तूर्त तरी दिसत आहे. काहीही असो, अजितदादांच्या नव्या राष्ट्रवादीत रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटलांमधील संघर्ष उघड आहे.

R...

SCROLL FOR NEXT