<div class="paragraphs"><p>Rupee Bank&nbsp;</p></div>

Rupee Bank 

 

Sarkarnama

पुणे

'रुपी'च्या ठेवीदारांना मिळणार नववर्षाचे 'गिफ्ट'

सरकारनामा ब्यूरो

पिंपरीः आर्थिक अडचणीत सापडलेल्या रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेत (Rupee Co-op-Bank LTD) पुणे, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील शेकडो ठेवीदारांचे एक हजार कोटी रुपये अडकलेले आहेत. त्यामुळे या `रुपी`चे खातेदारांसह विलिनीकरण करून घेण्याची तयारी सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने दाखवली आहे. तसा प्रस्ताव 'रुपी' बँकेच्या प्रशासक मंडळासह रिझर्व बॅँकेसमोर सारस्वत बॅंकेने (Saraswat Bank) ठेवला आहे. त्यामुळे 'रुपी'च्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला असल्याची प्रतिक्रिया त्यासाठी पाठपुरावा करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक संदीप वाघेरे (Sandip Waghere) यांनी शुक्रवारी (ता.३१ डिसेंबर) दिली. तसे झाले, तर 'रुपी'च्या ठेवीदारांना नववर्षाचे हे मोठं गिफ्ट असणार आहे, असे ते म्हणाले.

`रुपी`चे विलिनीकरण किंवा ती सुरु करण्यासाठी न्यायालयापासून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्यापर्यंत वाघेरे हे ही सातत्याने पाठपुरावा करीत होते. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील रुपी `च्या शेकडो खातेदार व ठेवीदारांच्या 1 हजार 297 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत आहेत. आठ वर्षापूर्वी विविध कारणांमुळे रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेवर निर्बंध लादले. त्यामुळे खातेदार, ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. तेव्हापासून बँक विलीनीकरणाच्या फेऱ्यात अडकली होती. `रुपी `च्या चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे ती चालू होऊ शकत असल्याने त्यासाठी परवानगी देण्याकरिता वाघेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयानेही विलीनीकरण किंवा पुनर्जीवन करण्याबाबत निर्णय घ्यावा, असा आदेश दिला होता.

वाघेरे यांनी सात दिवसांपूर्वी डॉ. कराड यांचीही भेट घेतली होती. रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे म्हैसाळा को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये अथवा इतर सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यावर `रुपी `चे `सारस्वत`मध्ये विलिनीकरण करण्याबाबत सारस्वत बँकेचे संचालक गौतम ठाकुर यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी त्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर सहा दिवसांत अतिशय वेगाने सूत्रे हलली. परिपूर्ण अभ्यास करून हा निर्णय घेतल्याचे ठाकुर यांनी सांगितले. 1 लाखापेक्षा जास्त गुंतवणूकदाराला आणि 15 वर्षापर्यंत गुंतवणूक केलेल्या खातेदारांना पूर्ण सहकार्य केले जाणार आहे. त्याचबरोबर 5 लाखापेक्षा जास्त रक्कम असलेल्याना 6 टक्के प्रमाणे योग्य तो परतावा देणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT