Pune News, 24 Jun : विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशामागे अनेक राजकीय कारणे असली, तरी संग्राम थोपटे यांच्या ताब्यातील आर्थिक अडचणीत सापडलेला 'राजगड सहकारी साखर कारखाना' बाहेर काढणे हे सर्वात प्रमुख कारण असल्याचे बोलले जात होते.
भाजप प्रवेशावेळी त्यांना या कारखान्यासाठी केंद्राकडून भरघोस निधी व अर्थसाह्य देण्याचे आश्वासनही मिळाले होते असे देखील सांगितले जाते. मात्र, मध्यंतरी तांत्रिक त्रुटींमुळे हे अर्थसाह्य रखडले होते. आता या त्रुटी दूर झाल्या असून केंद्राकडून मदत मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) महाराष्ट्र शासनामार्फत आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना भांडवली गुंतवणूक आणि खेळत्या भांडवलासाठी अर्थसाह्य देण्याचे धोरण आहे. त्यानुसार राज्यातील ५ सहकारी साखर कारखान्यांच्या सुमारे १,२६३ कोटी १७ लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीच्या त्रुटींचा पूर्तता अहवाल साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवला आहे.
राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे या कारखान्यांना लवकरच कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या ५ साखर कारखान्यांना मिळणार कोट्यवधींचा निधी मिळणार आहे. राजगड सहकारी साखर कारखाना (भोर, पुणे) माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या या कारखान्याला ४४७.८५ कोटी रुपये मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे कारखान्याची मोठी अडचण दूर होईल.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना (इंदापूर, पुणे) पृथ्वीराज जाचक यांच्या या कारखान्यासाठी ३६१.४१ कोटी रुपयांचे कर्ज प्रलंबित आहे. रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना (शिरूर, पुणे) माजी आमदार अशोक पवार यांच्या या कारखान्यासाठी १८४.९२ कोटी रुपये प्रस्तावित आहेत.
कुकडी सहकारी साखर कारखाना (अहिल्यानगर/नगर) : राहुल जगताप यांच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी कारखान्यासाठी ४९.८५ कोटी रुपये मंजूर केले जाणार आहेत. तसेच श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना (सोलापूर): धर्मराज काडादी यांच्या या कारखान्यासाठी १९९.१४ कोटी रुपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
पुणे साखर आयुक्तालयाचे साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारमार्फत पाठवलेल्या कर्ज मंजुरी प्रकरणात ७ पैकी ५ कारखान्यांनी आयुक्तालयाकडे खुलासे सादर केले होते. हे पूर्तता अहवाल आता शासनाकडे पुढील निर्णयासाठी पाठवले असून, राज्य शासनाकडून कर्जमंजुरीचे हे प्रकरण अंतिम मंजुरीसाठी थेट 'एनसीडीसी'कडे पाठवले जाईल. त्यामुळे, संग्राम थोपटे यांनी साखर कारखान्याला वाचवण्यासाठी घेतलेला भाजप प्रवेशाचा निर्णय आता अखेर सत्कारणी लागणार असल्याचे बोले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.