sanjay raut, ajit pawar Sarkarnama
पुणे

Sanjay Raut News : संजय राऊतांनी धरले धारेवर; जिंकण्याची खात्री आहे तर फडणवीस, अजित पवार धमक्या का देत आहेत?

Political News : महायुतीला महाराष्ट्रात जिंकण्याची खात्री असेल तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धमक्या का देत आहेत? बारामती, शिरूर मतदारसंघात लोकांना मताधिक्य न दिल्यास बघून घेईन, अशा धमक्या अजित पवार यांच्याकडून दिल्या जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

Sachin Waghmare

Pune News : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात असल्याने राज्यातील वातवरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांनी महायुतीच्या कारभारावर सडकून टीका करताना सरकारच्या कारभाराची वाभाडे काढली आहेत.

महायुतीला मुंबईत दोन ठिकाणी तसेच, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नाशिक मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत. महायुतीला महाराष्ट्रात जिंकण्याची खात्री असेल तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) धमक्या का देत आहेत? बारामती, शिरूर मतदारसंघात लोकांना मताधिक्य न दिल्यास बघून घेईन, अशा धमक्या अजित पवार यांच्याकडून दिल्या जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. (Sanjay Raut News)

पुण्यातील उंड्री येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजय मोरे, माजी आमदार महादेव बाबर आदी या वेळी उपस्थित होते. व्यापारी, उद्योजकांना नोटीस पाठवून दंड आकारण्याची धमकी दिली जात आहे. आर्थिक हितसंबंध असलेले काहीजण धमक्यांना भीक घालतील पण जनता जुमानणार नाही. अनेक वर्षे आपण मंत्री आहात, ही भाषा तुम्हाला शोभते का? बारामतीमध्ये तळ ठोका, तंबू ठोका. काही होणार नाही. चार जूनला सरकार बदलले दिसेल, अशी टीका राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल. त्यासोबतच बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. सध्या महायुतीकडून ज्या पद्धतीने राजकारण केले जात आहे, ते महाराष्ट्राला पटलेले नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींना गांभीर्याने घेवू नका

नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाबाबत वक्तव्य केले होते. याबाबत राऊत म्हणाले, मोदी यांना गांभीर्याने घेवू नका. देशात २०१४ मध्ये मोदी यांच्याबाबत जी लोकभावना आणि प्रेम होते. ते सध्या राहुल गांधी यांच्याबाबत पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांना देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

विदर्भात नागपूरसह सर्व जागा मविआला मिळतील

केंद्र सरकारने गुजरातमधील कांद्यावरील निर्यातबंदी उठवली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. परंतु आम्ही सर्वांनी आवाज उठवला. त्यामुळे सरकारने राज्यातील कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. विदर्भात नागपूरसह सर्व जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळेल, असा दावा त्यांनी केला.

SCROLL FOR NEXT