Pune Shivsena UBT News : विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. महाविकास आडघाडीतील मित्रपक्ष विधानसभा निवडणुकीतील पराभव मागे टाकत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक ताकतीने लढण्याच्या दृष्टिकोनातून संघटन बांधणीला लागले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील संघटनात्मक बांधणी करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून आज खासदार संजय राऊत यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केली.
पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती मधील मित्रपक्ष एकत्रित लढणार की स्वबळावर याबाबतच्या चर्चा सध्या रंगलेला पाहायला मिळत आहेत. अशातच खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मुंबई महापालिका निवडणूक ही स्वबळावरती तर इतर 14 महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं सूतोवाच केले आहे.
यानंतर ठाकरे गटाच्या पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये. पुणे महापालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडी म्हणूनच लढाव्या असं मत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्यापुढे व्यक्त केलं. मात्र महाविकास आघाडीमध्ये एकत्रित निवडणुका लढायच्या असल्या तरी जागा वाटपामध्ये ठाकरे गटाला सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात अशी मागणी देखील यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
विधानसभा निवडणुकी(Vidhansabha Election) वेळी पुणे शहरातून ठाकरेंच्या सेनेला एकमेव कोथरूड विधानसभा मतदार संघाची जागा मिळाली मात्र त्या जागे सोबतच हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी देखील ठाकरेंची सेना आग्रह होती. या जागा आपल्याला मिळाल्या असत्या तर विधानसभेचे चित्र काहीच वेगळं असतं असं देखील मत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे महापालिकेच्या जागा वाटपावेळी जिंकण्याची शक्यता असलेल्या जागा या मित्र पक्षाला जाऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पुणे महापालिकेमध्ये महाविकास आघाडी(MVA) म्हणून निवडणूक लढल्यास किमान 70 जागा या ठाकरे गटाला वाटायला याव्यात, असा सूर या बैठकीत पाहायला मिळाला. यावेळी खासदार संजय राऊत यांनी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देत आपण महापालिकेत जास्त जागा घेऊ असं आश्वासन दिलं. त्यामुळे सध्या तरी 70 ते 75 जागा या जागा वाटपामध्ये मागायच्या आणि किमान 50 जागां आपल्या पदरात पाडून घ्यायचं काही करून 25 ते 30 जागा जिंकू शकू असंच काहीस गणित सध्या ठाकरे गटाचं असल्याचं बोललं जात आहे.
मागील महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना एक संघ असताना स्वबळावरती निवडणूक लढताना दहा जागांवरती विजय मिळवण्यात यश आलं होतं. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढल्यास आपण अधिक जागा जिंकू असा विश्वास स्थानिक नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या बैठकीला पुणे शहरातील अनेक नगरसेवक अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. काल सायंकाळी अचानक खासदार संजय राऊत हे बैठक घेणार असल्याच्या सूचना माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या मात्र अनेकांचा आधीच प्रोग्राम ठरला असल्याने राऊत यांच्या बैठकीला जाणं अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी टाळलं बहुतांश माजी नगरसेवक हे लग्नकार्यातच व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.