
Mahavikas Aghadi Politics : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला. याचाच भाग म्हणून निवडणूक कालावधीत आणि त्यापूर्वी महाविकास आघाडीने सरकार विरोधात जी काही आंदोलन केली. त्यातील बहुतांश आंदोलन ही महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांनी एकत्रित केली.
मात्र आता विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या तिन्ही पक्षांची तोंड तीन दिशेने झालेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पुण्यात विषय एकच मात्र महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची तीन आंदोलन पाहायला मिळत आहेत. राज्यातील काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांनी एकत्रित मोट बांधून लोकसभा निवडणुका लढल्या. या तिन्ही पक्षांची या निवडणुकीत एकी दिसली याचा परिणाम देखील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पाहायला मिळाला. महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात विजय महाराष्ट्रात मिळवला.
त्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील या तिन्ही पक्षांनी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र जागा वाटपावरून या तिन्ही पक्षांमध्ये खटके उठताना पाहिल्या मिळाले, असं असलं तरी स्थानिक पातळीवर या तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठका विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून होताना पाहायला मिळाल्या. त्यासोबतच सरकार विरोधातील आंदोलन देखील या पक्षांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित केल्याचं पाहायला मिळालं. या आंदोलनाला महाविकास आघाडीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहत होते.
मात्र विधानसभा निवडणुकीनंतर काहीच चित्र बदलल्याचं पाहायला मिळत आहे. परभणी येथे पोलीसांच्या मारहाणीमुळे उच्च शिक्षित सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप होत आहे. त्याच्या चौकशीबाबत व केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटीच्यावतीने आज गुरूवार सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
तर याच विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील आज सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, आंदोलन केले गेले. महाविकास आघाडीतील दोन्ही मित्र पक्षांनी केलेल्या आंदोलनाचे विषय एकच होते. ठिकाणही जवळ जवळ होती आणि वेळही जवळपास सारखीच होती.असं असताना देखील या दोन्ही महाविकास आघाडीच्या पक्षांनी स्वतंत्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
याशिवाय महाविकास आघाडीतील(MVA) तिसरा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून देखील भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेत अपशब्द वापरल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आंदोलन (शुक्रवार) आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा विषय एकच मात्र आंदोलनं वेगळी असं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेला एकत्रित निवडणुका लढलेले हे तिन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला वेगवेगळे सामोरे जाण्याचा विचार करता आहेत का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.