
Pune News : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? याबाबत शंका कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी स्थानिक नेत्यांकडून तिन्ही पक्षांमध्ये होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईची महापालिका स्वबळावर लढण्याबाबत वाच्यता केली आहे.
पुणे दौरा वर असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला राऊत म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकारचा कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यामुळे राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका लवकरच होतील अशी शक्यता आहे. त्या दृष्टीकोनातून पक्ष आणि संघटन बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून आज पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेण्यात येणार आहे. त्यासाठी आज दिवसभर बैठका घेणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालावरती विचार मंथन करण्यापेक्षा पुढे जाण आवश्यक आहे. गेले अनेक वर्ष आम्ही निवडणुका लढवत आहोत. मात्र गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जात आहेत. त्या पद्धतीने गेल्या 70 वर्षात लढवल्या गेल्या नाहीत. तरी देखील विधानसभा निवडणुकांमध्ये लाखो लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी आणि पक्ष संघटन वाढविण्यासाठी पुढे जाणे आवश्यक असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी चर्चा सुरू आहे. भाजपसोबत महायुतीत असताना देखील शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढत होती. स्थानिक पातळीवर अनेक नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतात. त्यामुळे या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये विधानसभा निवडणुकीत (Vidhan sabha Election) मुंबईत काही जागा आम्हाला मिळू शकल्या नाहीत. मात्र त्या मिळाल्या असत्या तर त्या ठिकाणी शिवसेनेने नक्कीच विजय मिळवला असता.
खेड आळंदीची जागा अगदी शेवटच्या क्षणी आम्हाला मिळाली आणि आम्ही ती जिंकली. तसेच शिरूरची जागा आम्हाला मिळाली असती तर त्या ठिकाणी देखील आम्ही नक्की विजय साकार केला असता असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुका हा कळीचा मुद्दा आहे. विधानसभा निवडणुकीत देखील मुंबईमधून आम्ही दहा जागा जिंकल्या तसेच चार जागा कमी मतांनी आम्हाला गमावल्या. मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिका निवडणूक काहीही करून आम्हाला जिंकावीच लागेल नाहीतर मुंबई वेगळी केली जाईल.
मुंबईमध्ये स्वबळावर निवडणूक लढावी असा कार्यकर्त्यांचा रेट आहे आणि आमची त्या ठिकाणी निर्विवाद ताकद देखील आहे. त्यामुळे मुंबई जर आपण स्वतंत्रपणे लढलो तर चांगला रिझल्ट देऊ शकतो, अशी शिवसैनिकांची भावना असल्याचं संजय राऊत म्हणाले. त्यामुळेच मुंबईमध्ये स्वबळावर निवडणूक लढवायची आणि पुणे, नाशिक, इतर महापालिकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवल्या जाण्याची शक्यता असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.