Santosh Murhe and Suresh Ghule Sarkarnama
पुणे

Maval NCP News : निवडणूक जवळ आली रुसव्या फुगव्याची वेळ झाली; मावळमध्ये राष्ट्रवादीत रंगले राजीनामा नाट्य

Santosh Murhe and Suresh Ghule : ऐन निवडणुकीच्या तोंडावरच पक्षांतर्गत नाराजीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात राजीनामा नाट्य रंगले आहे.

उत्तम कुटे

Pimpri Political News : एरव्हीही राजकीय पक्षांत या ना त्या कारणावरून नाराजीनाट्य सुरुच असते. परंतू निवडणूक जवळ आली की ते आणखी वाढते. त्याचा प्रत्यय मावळ तालुक्यात (जि.पुणे) लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नुकताच आला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे यांनी स्थानिक पातळीवर पक्षात आपल्याला डावलले जात असल्याच्या नाराजीतून राजीनामा दिला. पण, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा निरीक्षक सुरेश घुले यांच्या शिष्टाईमुळे त्यांची नाराजी दूर झाली.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचे एकनिष्ठ मुऱ्हे अजितदादांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. पक्ष फुटल्यानंतरही ते दादांबरोबरच राहिले. त्यामुळे त्यांच्या नाराजीची तातडीने दखल घेण्यात आली. घुलेंनी जातीने त्यात लक्ष घातले. दरम्यान, मुऱ्हेंचा राजीनामा जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही स्वीकारला नव्हता.

दुसरीकडे घुलेंनी पक्षाचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे व इतर सबंधितांची काल (ता.26) बैठक घेतली. त्यात मुऱ्हेंची नाराजी दूर करण्यात आली. राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु असल्याने आठवडाभराने पुन्हा सर्वांची बैठक घेणार असल्याचे घुलेंनी आज (ता.27) 'सरकारनामा'ला सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, निमंत्रणपत्रिकेत नाव न टाकणे तसेच कार्यक्रमाला बोलावले जात नसल्याच्या नाराजीतून मुर्हेंनी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, ही नाराजी वरिष्ठांमुळे दूर झाली असून आता पुन्हा पूर्वीच्या जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फक्त पदाचा राजीनामा दिला होता, पक्षाचा नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मतभेद सगळीकडे असतात, पण कुणावर अन्याय होऊ देणार नाही, असे या यशस्वी शिष्टाईनंतर घुले म्हणाले. तशीच प्रतिक्रिया खांडगे यांनीही दिली. एवढ्या मोठ्या पक्षात किरकोळ मतभेद असणे स्वभाविक आहे, असे तेही म्हणाले.

अन् मावळ तालुका राष्ट्रवादीतील चार एस कायम राहिले

संतोष मुऱ्हेंसह मावळात राष्ट्रवादीचे फोर एस पदाधिकारी आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीचे चार एस तथा फोर एस म्हणूनच ते ओळखले जातात. पक्षाचे तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक संतोष भेगडे, पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, तर सुनील दाभाडे हे मावळ तालुका कार्याध्यक्ष आहेत. मावळातील राष्ट्रवादीचे चौथे एस असलेले पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे यांनी राजीनामा दिला असता, तर ही एसची चौकट मोडली गेली असती. मात्र, तो नामंजूर झाल्याने ती आणि पक्षाची ताकद सुद्धा अबाधित राहिल्याची चर्चा आता मावळात आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT