Canteen at Sassoon Hospital faces possible disruption in food services due to LPG shortage, prompting hospital administration to seek urgent help from the district administration in Pune. Sarkarnama
पुणे

Pune Sassoon Hospital : ससून रुग्णालयालाही गॅस तुटवड्याचा फटका; प्रशासनाचे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचं पत्र

Pune Sassoon Hospital News : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या कँटीनमध्ये एलपीजी गॅस टंचाईची भीती निर्माण झाली आहे. फक्त दोन दिवसांचा गॅस साठा शिल्लक असल्याने प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने पुरवठा करण्याची मागणी केली.

Sudesh Mitkar

Pune News : शहरातील प्रमुख सरकारी रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयाच्या कँटीनमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच गॅस साठा उपलब्ध आहे. गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यातील अडचणींमुळे कँटीनमध्ये चहा बनवणेही बंद करण्याची वेळ आली आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना तातडीने पत्र पाठवले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून इराण इजराइल संघर्षामुळे कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. याचा फटका छोट्या हॉटेल्स, मेस, होस्टेल आणि रुग्णालयांच्या कँटीनला बसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना अफवा पसरवू नये असे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात पुरवठा नियमित नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आधारभूत सुविधा मिळत राहतील.

ससून रुग्णालयाच्या कँटीनमध्ये रोज सुमारे 800 जणांचे जेवण तयार केले जाते. हे जेवण मुख्यतः रुग्णांच्या नातेवाइकांसाठी, उपचारासाठी आलेल्या बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांसाठी आणि डॉक्टर, कर्मचारी यांच्यासाठी असते. सध्या उपलब्ध असलेला गॅस साठा संपुष्टात आल्यास दोन दिवसात कँटीन पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण मिळणे अवघड होईल.

ससून रुग्णालयाचे, सध्याच्या परिस्थितीत मोठी अडचण निर्माण झालेली नाही, पण शहरातील कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यातील टंचाईमुळे भविष्यात समस्या उद्भवू शकते. त्यामुळे गॅस एजन्सींना रुग्णालयाला प्राधान्याने सिलिंडर पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करण्यात आली आहे. असे ससून रुग्णालयाचे अधीक्षक यलप्पा जाधव यांनी सांगितले,

जाधव पुढे म्हणाले, सध्या उपलब्ध असलेला गॅस साठा फक्त दोन दिवस पुरेल एवढाच आहे. यामुळे कँटीन व्यवस्थापकाने काही मेन्यूमधील पदार्थ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः ज्या पदार्थांना जास्त तेल लागते, असे पदार्थ आता कमी करण्यात आले आहेत. ससून मधील कँटीन विशेषतः निवासी डॉक्टरांसाठी आहे. निवासी डॉक्टरांच्या जेवणावर परिणाम झाल्यास त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

कँटीन व्यवस्थापक मलंग तांबोळी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, "गॅस संपला तर 800 लोकांचे जेवण कसे बनवायचे, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. म्हणून आम्ही गॅसला पर्याय म्हणून इंडक्शनवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. सध्या इंडक्शनवर काही पदार्थ तयार केले जात आहेत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT