Barsu Refinery Protest
Barsu Refinery Protest  Sarkarnama
पुणे

Barsu Refinery News : बारसू प्रकरणात मुख्यमंत्री, उद्योगमंत्री खोटं बोलतायं ; आंदोलनाचे प्रणेते चव्हाण यांचा दावा

सरकारनामा ब्यूरो

Barsu Refinery News : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी उभारण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या येथे माती तपासणी सुरु आहे. त्याला येथील ग्रामस्थांचा विरोध आहे.

"बारसू प्रकल्पाला ९० टक्के स्थानिकांचा विरोध तर आहेच, पण संबंधित बाधित ग्रामपंचायतचे ठराव देखील आहेत,’’ असा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा बारसू आंदोलनाचे प्रणेते सत्यजित चव्हाण यांनी फेटाळून लावला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

गेल्या चार दिवसापासून येथे आंदोलन सुरु होते. काल (शुक्रवारी) संतापलेल्या शेकडो आंदोलकांनी माती परीक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलन चिघळलं. पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नंतर लाठीमार केला. यात काही जण जखमी झाले, असा आंदोलकांचा आरोप आहे.

"बारसू येथे प्रकल्पासाठी २०२१ पासून सरकार प्रयत्नशील आहे. सरकार चर्चेसाठी या, असे म्हणते. बारसूला भेट देण्यासाठी आम्ही सरकारला ऑक्टोबरपासून पत्र दिले. पण त्यांनी भेट दिली नाही की चर्चेलाही बोलावले नाही, असा दावा चव्हाण यांनी केला.

"आंदोलकांना चेपण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पोलीस आणले आहेत. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री बारसू प्रकरणी साफ खोटे बोलत आहेत. आंदोलकांना आजपर्यंत कोणत्याही बैठकीला बोलविले नाही, असे चव्हाण म्हणाले.

सत्यजित चव्हाण म्हणाले, "हा प्रकल्प लाल वर्गवारीतला आहे. पर्यावरणाचा यामुळे ऱ्हास होणार आहे. आमचे गैरसमज दूर करणे वगैरेची गरज नाही. हा प्रकल्प आम्हाला नको आहे. तमिळनाडूतील अशा तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे अहवाल आम्ही पाहिले आहेत. आम्हाला कोकणाचा विकास हवा आहे. मात्र हा प्रकल्प म्हणजे विकास नव्हे,"

प्रकल्पाला ७० टक्के स्थानिकांचे समर्थन असल्याचा राज्य सरकारचा दावा धांदात खोटा आहे. राजापूर परिसरातील पाच ग्रामपंचायतीच्या परिसरात बारसू येथे तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. प्रकल्प नको म्हणून पाचही ग्रामपंचायतींनी ग्रामसभांचे ठराव केले आहेत. या प्रकल्पाला ९० टक्के स्थानिकांचा विरोध आहे. तरीसुद्धा सरकार ७० टक्के स्थानिकांचे प्रकल्पाला समर्थन आहे, असा खोटे सांगत आहे. सरकारला समर्थन दाखवायचे असल्यास त्यांनी मतदान घ्यावे, असे आव्हान चव्हाण यांनी दिले.

दरम्यान, पोलिसांना लाठीचार्जचे आदेश कुणी दिले याची चौकशी करू, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र लाठीचार्ज झाला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. ७०% शेतकऱ्यांचा प्रकल्पास पाठिंबा आहे, पण काही जण त्यांना भडकावत असल्याचा आरोप शिंदेंनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT