Rishiraj Pawar
Rishiraj Pawar Sarkarnama
पुणे

अशोक पवारांचा ‘मास्टर स्ट्रोक’ : ‘घोडगंगा’च्या अध्यक्षपदाची सूत्रे ऋषिराज पवारांच्या हाती!

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) पॅनेलने शिरूर (Shirur) तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (Ghodganga Sugar Factory) निवडणुकीत घवघवीत यश मिळविले. पॅनेलचे प्रमुख या नात्याने आमदार ॲड. पवार हेच कारखान्याचे चेअरमन होणार, हे गृहित धरले जात असतानाच आज अनपेक्षितपणे त्यांचे चिरंजीव आणि कारखान्यावर बिनविरोध निवड झालेले संचालक ऋषिराज पवार (Rishiraj Pawar) यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. स्वतः पवार यांनी नव्या पिढीकडे कारखान्याची आणि एकूणच राजकारणाची सूत्रे सोपवत मास्टर स्ट्रोक लगावला. (Selection of Rishiraj Pawar as President of Ghodganga Cooperative Sugar Factory)

घोडगंगा कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ निवडणूकीत आमदार पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने वीस पैकी १९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते. तर अध्यक्षपदी निवड झालेले ऋषिराज पवार यांची ब वर्ग मतदार संघातून संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाली होती. या निवडणूकीनंतर, आमदार पवार हेच पुन्हा अध्यक्ष होणार, अशी सर्वच पातळ्यांवर चर्चा होती.

सलग २५ वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भूषवित त्यांनी कारखान्याची प्रगती, विस्तार व इतर प्रकल्पांतून विकास साधला होता. त्यामुळे सद्यस्थितीतील काहीशा अडचणीच्या स्थितीत कारखान्याला सावरण्यासाठी व पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी तेच पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील अशी राजकीय स्थिती होती. त्यांच्या निवडीचे केवळ सोपस्कार बाकी असल्याचे राजकीय तज्ज्ञदेखील सांगत होते. मात्र, या सर्व शक्याशक्यता मोडून काढत आमदार पवार यांनी ऋषिराज पवार यांच्या माध्यमातून नव्या नेतृत्वाला संधी दिली.

अशोक पवारांचे धक्कातंत्र

नव्यांना संधी म्हणून ऋषिराज पवार यांची निवड झाल्याचे बोलले जात असले तरी आमदार अशोक पवार यांचे हे धक्कातंत्र भल्याभल्यांना हादरविणारे ठरले. विरोधी गोटालाही या निवडीने हादरा बसल्याचे दिसून आले. ऋषिराज पवार यांच्याबरोबरच उपाध्यक्षपदी पोपट रामदास भुजबळ यांनाही काहीशा अनपेक्षितपणे संधी मिळाली. या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी जाहिर केले.

सेफ गेम

विरोधी गटाने आमदार पवार यांच्या संचालक पदावर आक्षेप घेतल्याने, या न्यायप्रविष्ट बाबीच्या पार्श्वभूमीवर आमदार पवारांनी सेफ गेम खेळताना शिरूर तालुक्याच्या राजकारणाची पुढील दिशाही जोमदारपणे दाखवून दिल्याची चर्चा आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदाची धूरा अनपेक्षितपणे खांद्यावर आलेले ऋषिराज पवार हे नवखे असले तरी आमदार पवार यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी त्यांच्या सोबत राहून कारखानदारीबाबतची इत्थंभूत माहिती आत्मसात केली होती. कारखान्यातील अनेक बारीक - सारीक बाबींचे ज्ञान त्यांनी अवगत केले होते. बीई. एमबीए व बी. टेक एमबीए असे उच्चशिक्षित असलेल्या ऋषिराज पवार यांना वयाच्या केवळ २८ व्या वर्षी चेअरमनपदाची संधी मिळाल्याने युवावर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

‘कारखाना सांभाळण्यास ऋषिराज कॅपेबल’

घोडगंगा कारखान्याच्या कार्यस्थळावर अध्यक्षपदी त्यांच्या नावाची घोषणा होताच राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी अभुतपूर्व जल्लोष केला. नव्या नेतृत्वाला वाव देण्याच्या उद्देशानेच ऋषिराज पवार यांना अध्यक्षपदाची संधी दिली असून, ज्येष्ठ नेते शरद पवार, युवा नेते अजित पवार व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आशीर्वाद त्याला लाभले असल्याचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी या निवडीनंतर ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. कारखानदारी सांभाळण्यास तो कॅपेबल असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कारखाना निवडणूकीदरम्यान, कारखानदारीसमोरील आव्हाने, साखर धंद्यातील बदलते प्रवाह याविषयावर त्याने मांडवगणसह तालुक्याच्या अनेक भागात जाहिर सभांतून उसउत्पादक सभासदांसमोर जे मुद्दे मांडले ते सभासदांना भावल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT