Baramati ST Depot
Baramati ST Depot Sarkarnama
पुणे

बारामतीत निघाला एसटी संपावर तोडगा

Vishnu Sanap

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers Strike) मागण्यासाठी सुरू असलेल्या संपावर बारामती एसटी आगारात तोडगा निघाला आहे. एसटीचे पुणे विभागाचे नियंत्रण रमाकांत गायकवाड (Ramakant Gaikwad) यांनी आज (ता.5 डिसेंबर) बारामती येथील आगारात येऊन एसटी कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि एसटीची भूमिका कर्मचाऱ्यांना समजून सांगितली. यानंतर कर्मचाऱ्यांना कामावर येण्याच्या त्यांनी केलेल्या आवाहनाला बारामतीच्या चालक-वाहकांनी व कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आजपासून (ता.5 डिसेंबर) शटल सेवा सुरू केली आहे. याबाबतची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी सुमारे एका महिन्यासासुन एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे बारामतीसह राज्यातील एसटीची सेवा विस्कळीत झालेली आहे. सर्वसामान्यांच्या प्रवासाचे वाहन तसेच, सुरक्षित प्रवासी वाहतुकीसाठी आजही लोक एसटीला प्राधान्य देतात. मात्र, एसटीचा संप सुरु असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्याचा फटका राज्यातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

याबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांची पगार वाढ करत या संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एसटी कर्मचारी त्यांच्या भूमीकेवर ठाम असल्याने संप सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे विभागाचे विभाग नियंत्रक गायकवाड यांनी आज बारामतीत चालक-वाहकासह कार्यशाळेच्या कर्मचाऱ्यांशीही सविस्तर चर्चा केली व कामावर येण्याचे आवाहन केले. या चर्चेनंतर चालक-वाहक व कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजपासून काम सुरू केले आहे.

आजपासून बारामती व एमआयडीसी या दोन्ही आगारातील शटल सेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली असून आगारातील 20 बसेस मार्गावर धावल्याची माहिती गायकवाड यांनी 'सरकारनामा'ला दिली आहे. शिवाय दौड आगारातील काही बसेसही सुरू झाल्या असून पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर व पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर आगारातून शिवशाही बसेस सुरू करण्यात अल्याचे त्यांनी सांगितले.

बारामती- भिगवण, बारामती -निरा, बारामती- फलटण, बारामती - वालचंदनगर, बारामती -जेजुरी या मार्गांवरील शटल सेवा आजपासूनच सुरू करण्यात येत असून लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील येत्या एक-दोन दिवसात सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

बारामती आगारातून बस सेवा सुरू झाल्याचा दिलासा पंचक्रोशीतील प्रवाशांना मिळणार असून यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, बारामती पुणे बारामती मुंबई यासह लांब पल्ल्याच्या गाड्या तातडीने सुरू कराव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT