Pargaon, 09 May : विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यास झुंजविणाऱ्या शिलेदाराच्या लेकीच्या लग्नाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आवर्जून हजेरी लावली. विशेष म्हणजे पवार कुटुंबीयांतील चौघांनी या लग्नाला उपस्थिती लावून निष्ठावंताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले आहे.
शरद पवारांसोबत (Sharad Pawar) माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार नीलेश लंके, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार विलास लांडे, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र पवार यांनीही नागापूर येथे येऊन शुभेच्छा दिल्या.
आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत निकम ( Devdutt Nikam) यांची मुलगी नीलिमा हिचा विवाह लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज यांचे चिरंजीव स्वप्नील यांच्याशी मोठ्या थाटामाटात झाला. या विवाह सोहळ्याला ज्येष्ठ नेते पवार यांनी हेलिकॉप्टरने नागापूरला येऊन नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले.
दरम्यान, लग्नाच्या आदल्या दिवशी जयंत पाटील यांनी निकम यांच्या नागपूर येथील निवास स्थानी भेट देऊन वधू वरास शुभेच्छा दिल्या होत्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लग्नाला हजेरी लावून वधू वरांसह शुभाशीर्वाद दिले. या वेळी पवारांसोबत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार नीलेश लंके हेही आले होते.
विधानसभा निवडणुकीत आंबेगाव मतदारसंघातून माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याच्या विरोधात देवदत्त निकम यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत निकम यांनी आपल्या एकेकाळच्या नेत्याला विजयासाठी झुंजायला लावले होते.
वळसे पाटील हे अवघ्या १५२३ मतांनी निवडून आले होते. विशेष देवदत्त शिवाजी निकम असे सारखे असलेल्या उमेदवाराने २९६५ मते घेतली आणि नाव साधर्म्य उमेदवारामुळे आम्ही जिंकलो, असे खुद्द वळसे पाटील बोलले होते. त्यामुळे निकम यांच्यासारख्या लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या लेकीच्या लग्नाला हजेरी लावून पवारांनी त्यांचे बळ वाढविण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे.
जयंत पाटील यांनी शुभेच्छा देताना निकम यांचा उल्लेख शरद पवारांचे निष्ठावान, उजवे हात असा केला होता. याशिवाय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही ‘निकम आमचे लढणारे , जीवाभावाचे सहकारी’, या भागातील लोकप्रिय नेतृत्व असल्याने पवारसाहेब खास शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.