
Kolhapur, 09 May : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत होण्याची शक्यता आहे. भविष्यकाळात महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून लढताना अनेक नेत्यांना प्रयत्नांची पराकष्टा करावी लागणार आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासमोर दुहेरी संकट असणार आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे नेतृत्व, काँग्रेसचा विस्तार, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद, आणि विधान परिषदेची जागा टिकवण्याचे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे. महायुतीमधील तीनही पक्षांकडून काँग्रेसचे शिलेदार आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यावर सतेज पाटील यांनाही मार्ग काढावा लागणार आहे. शिवाय विधान परिषदेसाठी लागणारी राजकीय गोळाबेरीजही त्यांनाच करावी लागणार आहे.
कोल्हापूर (Kolhapur) दक्षिण विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये आमदार अमल महाडिक यांच्याकडून पराभव झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून विधिमंडळात एन्ट्री केली. तर 2021 च्या विधान परिषदेत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सलग 10 वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. तत्कालीन वेळीही जिल्ह्यातील राजकीय समीकरणांचा फायदा सतेज पाटील यांना झाला होता. मात्र सध्याची राजकीय परिस्थितीनुसार महायुती एकत्र आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून एकट्या आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या खांद्यावर येणार आहे. त्यातच पुढील वर्षी होणारी विधान परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांना रणनीती आखावी लागणार आहे. त्याचे मोठे आव्हान पाटील यांच्यासमोर असणार आहे. विधान परिषद निवडणुकीला वर्षाचा कालावधी असला तरी त्यांना निवडून येण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठे यश मिळविण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठीही प्रयत्न करावी लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गटातून होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत या मतदारसंघातील पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद यांच्या सदस्यांची मोठी मदत होते. मात्र, मतदारसंघात काँग्रेसचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असल्याने मदत करणाऱ्यांच्या विरोधातच सतेज पाटील यांना प्रचार करावा लागला. त्यामुळे विद्यमान आमदारांना सोपी असलेली निवडणूक सतेज पाटील यांनी घेतलेल्या प्रचार दौऱ्यामुळे अवघड झाली. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत यांची मदत होणार का? हे भविष्य काळ ठरवणार आहे.
मागील विधान परिषदेच्या निवडणुकीत राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा शब्द न पाळल्याने माजी मंत्री विनय कोरे यांच्या मनात सतेज पाटील यांच्या बाबत खदखद आहे. याचा फटका देखील भविष्यकाळात बसू शकतो का? हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व आहे. यापूर्वी पक्षाच्या पलीकडे जाऊन सतेज पाटील यांना राजकीय मदत होत आली आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, स्थानिक स्वराज्य संस्था याची समीकरणे नव्याने तयार झालेली आहेत. जुन्या समीकरणांचा फायदा सतेज पाटलांना होणार की नाही याबाबत आता शंका उपस्थित होऊ लागली आहे. नव्या समीकरणांना जुळवून घेण्यासाठी सतेज पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.