Sharad Pawar-Shivsena-Vijay shivtare
Sharad Pawar-Shivsena-Vijay shivtare Sarkarnama
पुणे

शिवसेना संपवायला पवारच जबाबदार; मोठे लोक कुठं काय गेम करतील, सांगता येत नाही : शिवतारेंचा आरोप

Vijaykumar Dudhale

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission) शिवसेनेचे (Shivsena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठविण्याचा निर्णय शनिवारी (ता. ८ ऑक्टोबर) रात्री घेतला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना अपेक्षित होता. कारण, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ‘जो निर्णय येईल, त्याचं स्वागत केलं पाहिजे,’ असं एक वक्तव्य केले होते. त्यामुळे हे मोठे लोक कुठे काही गेम करतील, सांगता येत नाही. शिवसेना संपवायला शरद पवारच जबाबदार आहेत. सगळा दोष पवारांचा आहे, यातून त्यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे, असा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला. (Sharad Pawar is responsible for ending Shiv Sena : Vijay Shivtare)

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याच्या निर्णयानंतर राज्यात विविध प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री शिवतारे यांनीही त्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, ती देताना शिवतारे यांनी शिवसेनेच्या या परिस्थितीला शरद पवारच जबाबदार आहेत, असा आरोप केला आहे. त्यावर राष्ट्रवादीकडून काय उत्तर येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवतारे म्हणाले की, विधानसभेची २०१४ ची निवडणूक झाल्यानंतर पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. तो पाठिंबा म्हणजे पवारांचा एक कट होता. शिवसेना-भाजपचा संसार पवार यांना चालू द्यायचा नव्हता. पवार यांनी कधीच शिवसेनेशी जुळवून घेतलं नाही. पवार यांची मैत्री हिंदूह्रदयसम्राट यांच्याशी असली तरी राजकिय मतभेद होतेच.

उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत पवार यांच्याकडे जाऊन बसले. शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमूडा ट्रँगल आहेत. त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले आहेत, हा इतिहास आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०१९ मध्ये एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांना पुढे करत ‘लाव रे तो व्हीडीओ’ म्हणायला लावले. गरज संपली की त्यांना झटकून टाकले, असेही शिवतारे यांनी नमूद केले.

विजय शिवतारे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या भोळेपणाचा फायदा शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतला आहे. शरद पवार यांचा डाव शनिवारी अखेर यशस्वी झाला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या कटकारस्थानाला जबाबदार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय दुर्दैवी आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, काँग्रेसची पंचसूत्री गाडा आणि माझ्यानंतर उद्धवला सांभाळा. याची आठवण कोणाला आता होत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेली युती तोडा, हे सांगायला १६ आमदार गेल्यानंतर तुम्हाला जायच असेल, तर तुम्हीपण जा, असे उद्धव ठाकरे आमदारांना म्हणाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने काय भानामती केली, कुणास ठाऊक, असा सवालही शिवतारे यांनी या वेळी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT