ZP election Daund : दौंड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांना भाजपने उमेदवारी दिल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
दौंड शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये बुधवारी (ता. 21) इच्छुक उमेदवार व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील इच्छुकांसमवेत आले होते. त्यामुळे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात चारचाकी व दुचाकी वाहनांची मोठी गर्दी होती.
दौंड पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन न करण्यात आल्याने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मनमानी पद्धतीने वाहने लावण्यात आली होती. निवडणुकीसाठी 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जात असताना बहुतांश जणांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले. अर्जासोबतची कागदपत्रांची जुळवाजुळव करताना इच्छुकांची दमछाक झाली. कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारांची घोषणा न केल्याने सर्व इच्छुक शेवटच्या दिवसापर्यंत अधिकृत उमेदवारीची प्रतीक्षा करीत होते.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वासुदेव शंकरराव काळे आणि माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी वासुदेव काळे यांच्या कन्या हर्षदा वासुदेव काळे यांनी मंगळवारी (ता. 20) खडकी गटातून अर्ज दाखल केला आहे. हर्षदा काळे यांना बुधवारी भाजपचा एबी फॅार्म मिळेल, अशी खात्री असल्याने त्या भाजप पदाधिकारी यांच्यासमवेत अर्ज दाखल करण्यासाठी आल्या होत्या; परंतु पक्षाने त्यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारली.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोमीलन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी दुपारी भाजपचे उमेदवार म्हणून जिल्हा परिषद गटासाठी अर्ज दाखल केला आहे. तर खडकी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यातील महायुतीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्षाने दौंड तालुक्यात स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने तालुक्यात या दोन पक्षातच लढत होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.